Ashok Kharat case update Sarkarnama
महाराष्ट्र

Ashok Kharat case update : कुणाकुणाची चौकशी होणार? तेजस्वी सातपुतेंनी पहिल्यांदाच पत्ते उघड केले

Tejasvi Satpute statement : तपासादरम्यान जे पुरावे समोर येतात, त्याआधारे तपास केला जातो. पुराव्यांच्या आधारे कोण व्यक्ती सहआरोपी आहे का, हे पाहिले जाते, अशी माहिती तेजस्वी सातपुते यांनी दिली.

Rajanand More

Ashok Kharat case SIT probe : संपूर्ण महाराष्ट्राला हादरविणाऱ्या नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथकाकडून (SIT) केली जात आहे. या पथकाच्या प्रमुख असलेल्या IPS अधिकारी तेजस्वी सातपुते यांनी मंगळवारी आतापर्यंत झालेल्या तपासाबाबत महत्वपूर्ण माहिती दिली. या प्रकरणाचा तपास हाती घेतल्यानंतर त्या पहिल्यांदाच माध्यमांसमोर आल्या.

अशोक खरातवर आतापर्यंत एकूण १२ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी ९ गुन्ह्यांचा तपास एसआयटी करत आहे. या नऊपैकी आठ गुन्हे हे महिलांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित तर एक गुन्हा फसवणुकीचा आहे. याबाबत माहिती देताना तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, १२ गुन्ह्यांपैकी नऊ गुन्ह्यांचा तपास एसआयटीकडे, दोन गुन्ह्यांचा अहिल्यानगर पोलिसांकडे आणि एका गुन्ह्याचा तपास नाशिक शहर पोलीस करत आहेत.

एसआयटीने आतापर्यंत नऊ गुन्ह्यांमध्ये केलेल्या तपासामध्ये ३० हून अधिक साक्षीदारांकडे विचारपूस केलेली असल्याची माहिती सातपुते यांनी दिली. या प्रकरणात अशोक खरातसोबत अनेक राजकीय नेते, व्यक्तींचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाल्या आहेत. याप्रकरणी त्यांची चौकशी एसआयटीने करण्याची मागणी होत आहे. यावरही सातपुते यांनी स्पष्टीकरण दिले.

कुणाकुणाची चौकशी होणार?

पदाधिकारी, अधिकारी यांना एसआयटीकडून बोलविण्यात येणार आहे का, किंवा अमुक व्यक्तील का बोलविले नाही, कधी बोलविणार, अशा प्रकारच्या अनेक शंका आणि प्रश्न असू शकतात. अनेक पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्यांनी मला मेसेज करून तशी विचारणा केली आहे. त्याबाबत सांगू इच्छिते की, दाखल गुन्ह्यामध्ये फिर्यादी आणि साक्षीदार जे सांगतात, त्याआधारे तपास होत असतो.

तपासादरम्यान जे पुरावे समोर येतात, त्याआधारे तपास केला जातो. पुराव्यांच्या आधारे कोण व्यक्ती सहआरोपी आहे का, हे पाहिले जाते. त्यानुसार त्याची चौकशी आणि इतर कायदेशीर कारवाई केली जाते. त्यामुळे या गुन्ह्यांच्या बाबतीत मुख्य आरोपी सोडून इतर कुणी कारणीभूत ठरले आहे का, कुणी याची इकोसिस्टीम निर्माण करण्यात सहाय्यभूत ठरले आहे का, या अंगानेही तपास करत आहोत, असे सातपुते यांनी सांगितले.

या गुन्ह्यांची पार्श्वभूमी तयार करण्यात कुणी मदत केली आहे का? याबाबत पुराव्यानिशी जर निष्पन्न झाले तर निश्चित कायदेशीर कारवाई केली जाईल, याबाबत मनामध्ये शंका बाळगू नये, असे सातपुते यांनी स्पष्ट केले. मागील १७ दिवसांपासून एसआयटी तपास करत आहे. अजूनही तपास सुरू आहे. आरोपपत्र दाखल करण्यासाठी ४० ते ४५ दिवसांचा कालावधी असल्याचेही सातपुते यांनी स्पष्ट केले.

तपासात काय निष्पन्न झाले?

साक्षीदारांकडे आणि पीडितेंकडे केलेल्या चौकशीमध्ये आरोपी खरात हा त्यांच्या श्रध्देचा गैरफायदा घेत असल्याचे समोर आले आहे. भीती दाखवत होता. पैसा उकळत होता. दैवी शक्ती असल्याचे भासवून सातत्याने अंधश्रध्दा पसरवत होता, मृत्यू भीती दाखवून महिलांचे लैंगिक शोषण करत असल्याचे आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

आठही गुन्ह्यांमध्ये पीडिता आणि त्यांचे कुटुंब अतिशय धाडसाने पुढे आले. त्यांनी फिर्याद दिल्यानेच आपण कारवाई करू शकलो, असेही सातपुते यांनी सांगितले. त्यामुळे त्यांची ओळख उघड न करणे हे आपले कर्तव्य आहे, असे आवाहनही त्यांनी केले.    

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT