Ashok kharat mobile data controversy: नाशिकमधील भोंदूगिरी प्रकरणात अडकलेला अशोक खरात याच्या मोबाईलमधून समोर आलेली माहिती धक्कादायक ठरत आहे. तपास यंत्रणांनी जप्त केलेल्या दोन मोबाईलमध्ये व्हॉइस नोट्स, चॅट्स आणि ऑडिओ क्लिप्सच्या माध्यमातून मोठ्या आर्थिक गैरव्यवहारांचे संकेत मिळाले आहेत. ‘आशीर्वाद’ आणि धार्मिक विधींच्या नावाखाली प्रत्यक्षात हवाला मार्गे पैशांची देवाणघेवाण सुरू असल्याचा संशय आता तपास यंत्रणांचा बळावला आहे.
तपासात असेही स्पष्ट झाले की, मुंबईतील एका आलिशान पंचतारांकित हॉटेलमधून हे संपूर्ण जाळे चालवले जात होते. या ठिकाणी दिवसाला 25 हजार रुपये भाड्याची खोली वर्षभरासाठी म्हणजेच 365 दिवसांसाठी बुक करण्यात आली होती. याच ठिकाणाहून अशोक खरात कोट्यवधी रुपयांचे व्यवहार आखले जात असल्याची माहिती समोर आली आहे.
बांधकाम क्षेत्रातील काही व्यावसायिकांच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर व्यवहार केल्याचा संशय आहे. एका बिल्डरचा सुमारे 300 कोटी रुपयांचा व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. नाशिक आणि पुणे येथील किमान 5 जण या रॅकेटमध्ये सहभागी असल्याची शक्यता तपासात व्यक्त करण्यात आली आहे. जमीन व्यवहारांमध्ये काळ्या पैशांचा वापर झाल्याचाही संशय तपास पथकाला आहे.
याशिवाय, महाराष्ट्र आणि कर्नाटकात देवदर्शनाच्या नावाखाली बनावट खाती उघडण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. पॅन आणि आधारचा वापर करून सहकारी पतसंस्थांमध्ये खाती उघडली गेली आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर पैशांची उलाढाल झाली, असेही तपासात समोर आले आहे.
दरम्यान, राहाता येथील समता पतसंस्थेच्या शाखेत 2021 साली उघडलेल्या सुमारे 100 खात्यांमधून 60 कोटींपेक्षा अधिक रकमेची देवाणघेवाण झाल्याची माहिती आहे. या सर्व खात्यांशी अशोक खरातचा संबंध असल्याचे आढळून आले असून अनेक खात्यांमध्ये तो वारसदार म्हणून नोंदवलेला आहे.
या प्रकरणात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित शाखेच्या व्यवस्थापकावरही कारवाई करण्यात आली आहे. शिर्डी पोलिसांकडून 19 खातेदारांची चौकशी सुरू आहे. तपासादरम्यान खरातच्या मालमत्ता आणि बँक खात्यांबाबतही अनेक धागेदोरे समोर आले आहेत.
अनेकांना फसवून मोठी संपत्ती उभी केल्याचा आरोप असलेल्या या प्रकरणात आता (ईडी) अंमलबजावणी संचालनालयाचीही एंट्री होण्याची शक्यता आहे. या घोटाळ्यात सहभागी असलेल्या कोणालाही सोडले जाणार नाही, असा इशाराही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.