Vijay Wadettiwar Sarkarnama
महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : रश्मी शुक्ला यांना हटवण्याचा आदेश धडकला; विजय वडेट्टीवारांनी लगेचच महायुतीला बेईमान म्हटले

Rashmi Shukla Removal Order: राज्याच्या पोलिस महासंचालक पदावरून रश्मी शुक्ला यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने हटवताच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची महायुती सरकारवर जोरदार टीका.

Pradeep Pendhare

Mumbai News : महाराष्ट्र राज्याच्या पोलिस महासंचालक पदावरून रश्मी शुक्ला यांना हटवण्याची कारवाई केंद्रीय निवडणूक आयोगाने केल्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल सुरू केला आहे.

काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारची बेईमानी करत असल्याचे स्पष्ट झाले, अशी खोचक टीका केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची ही कारवाई म्हणजे, महायुती सरकारला एकप्रकारे धक्काच असल्याचे म्हटले जात आहे.

विधानसभा निवडणुकीचा (Election) अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. राज्यात सर्वत्र राजकीय धामधूम सुरू आहे. यातच केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलिस महासंचालक पदावरून रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचा आदेश राज्याच्या मुख्य सचिवांना पाठवला. निवडणूक आयोगाने हा सर्वात मोठा निर्णय घेताच, महायुती सरकारवर महाविकास आघाडीसह राज्यातील प्रमुख विरोधकांनी हल्ला चढवला आहे.

राज्याच्या पोलिस महासंचालक पदावरून रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली होती. केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले, असताना त्यांना या मागणीबाबत प्रश्न करताच, ते देखील काहीसे गोंधळले होते. परंतु निवडणूक आयोगाने आता निर्णय घेत, त्याचा आदेश राज्याच्या मुख्य सचिवांना केला आहे. या निर्णयावर राज्याचे काँग्रेस (Congress) नेते तथा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे स्वागत करत, टायमिंग साधत महायुती सरकारवर टीका केली.

"महायुती सरकार बेईमानी करत होते, हे आज स्पष्ट झाले. गंभीर स्वरूपाचे आरोप असलेल्या पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ देण्याची अशी कोणती मजबुरी महायुती सरकारची होती?", असा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी केला.

काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी पुढे महायुती सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, "महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पारदर्शक पद्धतीने होऊ नये म्हणून सरकारने त्यांना मुदतवाढ दिली होती. असंवैधानिक मार्गाने आलेल्या सरकारने असंवैधानिक मार्गाने अधिकाऱ्यांना पदांवर बसवले होते, हे आज स्पष्ट झाले. मर्जीतील अधिकाऱ्यांना मुदतवाढ देऊन सत्तेचा दुरुपयोग महायुती सरकारने केला होता!"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT