Mumbai News : नेस्को सेंटरमध्ये गुरुवारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्याप्रसंगी शिवसेना नेते व माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूविषयी केलेल्या वक्तव्यानंतर त्याबाबत राजकीय वर्तुळात उलट-सुलट प्रतिक्रिया ऐकवयास मिळत आहेत. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच कदम यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर आता बाळासाहेब ठाकरेंचा मृत्यू कधी झाला होता अन् नेमकी घोषणा केली होती याची चर्चाही सुरु झाली आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हे जुलै 2012 पासून श्वसनाच्या आणि पोटाचे विकाराने त्रस्त होते. जुलै 2012 मध्ये त्यांना श्वास घेण्यास त्रास झाल्यामुळे मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुमारे आठवडाभर उपचार घेतल्यानंतर ते घरी परतले होते. रुग्णालयातून मातोश्रीवर परतल्यानंतर त्यांच्या निवासस्थानीच त्यांच्यावर उपचार सुरू ठेवण्यात आले होते. त्यांच्या मातोश्रीवर खोलीला तात्पुरत्या ICU (अतिदक्षता कक्ष) चे स्वरूप देण्यात आले होते.
नोव्हेंबर 2012 मध्ये त्यांची प्रकृती पुन्हा गंभीर झाली. 14 नोव्हेंबर 2012 च्या रात्री त्यांची तब्येत जास्त बिघडली आणि शेवटचे सुमारे 72 तास (साधारण 3 दिवस) प्रसिद्ध फुफ्फुस तज्ज्ञ डॉ. जलील पारकर यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांची टीम त्यांच्यावर मातोश्रीवरच उपचार करत होती. त्या तीन दिवसांत तब्यतेविषयाची माहिती डॉ. पारकर हे मेडिकल बुलेटिन काढून प्रसार माध्यमांना देत होते. मृत्यू पूर्वीच्या शेवटच्या तीन दिवसांमध्ये म्हणजेच 14 ते 17 नोव्हेंबर दरम्यान त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक होती.
अखेर 17 नोव्हेंबर 2012 रोजी दुपारी 3 वाजून 33 मिनिटांनी हृदयक्रिया बंद पडल्याने त्यांनी शेवटचा श्वास घेतला. संध्याकाळी 5 वाजता डॉ. पारकर यांनी काही शिवसेना नेत्यांसोबत दुपारी 3 वाजून 33 मिनिटांनी बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले असल्याची माहिती दिली. दुसरीकडे शिवसेना नेते व माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू या घोषणेच्या पूर्वी दोन दिवस अगोदर झाला असल्याची माहिती डॉ. पारकर यांनीच त्यांना दिली होती, असा दावा त्यांनी दसरा मेळाव्याप्रसंगी बोलताना केला आहे.
त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूची माहिती देत असताना डॉ. पारकर अथवा शिवसेना नेते रामदास कदम या दोघांपैकी कुणीतरी एक जण खोटे बोलत असल्याचे स्पष्ट होतं आहे. त्यामुळे आता या विषयवरूनच राजकीय वर्तुळात आता चर्चा रंगली आहे.