Kokan News : विधानसभा विरोधी पक्ष नेते पदासाठी भास्कर जाधव यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. याबाबतचे पत्र अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मात्र सद्यस्थितीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे 20 आमदार असून विरोधी पक्ष नेतेपदासाठी आवश्यक 29 आमदारांची अट पूर्ण होत नाही. त्यामुळे यावेळी विरोधी पक्ष नेते पद द्यायचे का? याबाबत नार्वेकर यांना विशेषाधिकारातून निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे या पत्रानंतरही विधानसभा अध्यक्ष कार्यालयाची भूमिका देखील महत्त्वाची ठरणार आहे.
विरोधी पक्ष नेते पदासाठी यापूर्वी भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) आणि सुनिल प्रभू यांच्यामध्ये स्पर्धा होती. मात्र भास्कर जाधव यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यामागे उद्धव ठाकरे यांचे मिशन कोकण असल्याचे सांगण्यात येते. कोकण हा ठाकरे यांच्यासाठी आज घडीला सर्वाधिक संवेदनशील विषय बनला आहे. लोकसभा निवडणुकीत रायगड आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या दोन्ही जागी ठाकरेंचा पराभव झाला. तर विधानसभा निवडणुकीतही भास्कर जाधव हे एकमेव आमदार ते ही कसेबसे काठावर निवडून आले आहेत.
आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणातील पक्षाची ओसरती लाट सावरण्यासाठी पावलं उचलण्याची गरज आहे. याच विचारातून भास्कर जाधव यांचे नाव फिक्स झाल्याचे कळते. जाधव यांना संविधानिक पद दिले तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कोकणाची किती काळजी करते हा संदेश देता येईल. शिवाय त्यांच्या आक्रमक स्वभावामुळे आणि भाषण शैलीमुळे सरकारवर वचकही ठेवता येईल असे मानले जाते. जाधव यांच्या आक्रमकतेचा कोकणातील पक्ष वाढीलाही चांगला उपयोग होऊ शकतो.
सुनील प्रभू हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे अत्यंत विश्वासू नेते मानले जातात. सोबतच मुंबई भागात पक्षाचे दहा आमदार आहेत. पण कोकणातील परिस्थिती सावरण्याची गरज असल्याने तेथे महत्त्वाचे पद द्यायला हवे. शिवाय सुनील प्रभू सध्या पक्षाचे प्रतोद आहेत. 2021 मध्ये पक्ष फुटी झाली तेव्हा प्रतोद पद किती महत्वाचे आहे, याची गरज लक्षात आली होती. आता पुन्हा पक्षफुटीसारखा प्रयोग होऊ नये यासाठी प्रतोदपदी विश्वासाचा आणि आक्रमक नेता हवा, अशी देखील ठाकरेंची भूमिका आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.