महाराष्ट्र

Maharashtra Drought : मोठी बातमी! राज्यात अखेर दुष्काळ घोषित होणार? पावसाची मोठी तूट; प्रशासनाकडून वेगाने हालचाली सुरू!

Maharashtra drought situation latest update : महाराष्ट्रात पावसाची तूट आणि पीक नुकसानीमुळे दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळ जाहीर करण्याबाबत प्रशासनाचा आढावा आणि शेतकऱ्यांसाठी मदत उपाययोजनांची तयारी जाणून घ्या.

Rashmi Mane

महाराष्ट्रात यंदा पावसाची हजेरी कमी झाल्याने अनेक भागांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाच्या दीर्घ खंडाचा थेट परिणाम खरीप पिकांवर झाला असून शेतकऱ्यांसमोर पाणीटंचाई, पीक नुकसान आणि आर्थिक संकट उभे राहिले आहे. 16 सप्टेंबरच्या राज्य मंत्रिमंडळासमोरील माहितीनुसार, राज्यातील 36 पैकी 20 जिल्ह्यांमध्ये 20 टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची तूट नोंदवण्यात आली होती.

याच पार्श्वभूमीवर दुष्काळ जाहीर करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय आणि तांत्रिक प्रकियेला वेग आला आहे. पावसाची मोठी तूट असलेल्या भागांमध्ये Trigger-1 लागू करण्यात आली आहे. आता Trigger-2 साठी आवश्यक असलेल्या विविध निकषांचे विश्लेषण केले जात आहे.

Trigger-2 मध्ये पिकांची स्थिती, जमिनीतील ओलावा, पिकांचे क्षेत्र, जलाशयातील पाणीसाठा आणि उपग्रहाद्वारे मिळणारा NDVI/NDWI सारखा डेटा तपासला जातो. अधिकृत दुष्काळ मूल्यांकनात पर्जन्यमान, शेती, रिमोट सेन्सिंग, जमिनीतील ओलावा आणि जलसाठ्याशी संबंधित निर्देशांकांचा विचार केला जातो.

मराठवाड्यात परिस्थिती अधिक चिंताजनक असल्याचे ताज्या अहवालांमधून समोर आले आहे. 20 सप्टेंबरपर्यंत मराठवाड्यातील पर्जन्यमान हंगामी सरासरीच्या केवळ 71 टक्के असल्याचे वृत्त आहे. या भागातील जलाशयांमधील पाणीसाठाही राज्यातील सर्वात कमी पातळीवर असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

दुष्काळाच्या मागणीसाठी राज्यातील विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. मनमाडमध्ये पावसाअभावी पिके सुकल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. नांदेडमध्ये एका शेतकऱ्याने "किलोभर सोयाबीन काढा, क्विंटलभर काजू-बदाम देतो" असे आव्हान दिल्याचे सांगण्यात येत आहे. तर धुळे-सोलापूर महामार्ग रोखण्याचा इशाराही देण्यात आला आहे. जालन्यात मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.

दरम्यान, राज्य सरकारने दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 ऑक्टोबरपासून दुष्काळी स्थितीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिल्याचे वृत्त आहे. राज्यातील 86 तालुक्यांमध्ये पावसाचा खंड 30 दिवसांपेक्षा अधिक राहिल्याची माहितीही समोर आली आहे.

राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समितीच्या अहवालानंतर पुढील निर्णयाची प्रक्रिया होणार आहे. या समितीत महसूल, कृषी, जलसंपदा आणि हवामान विभागासह संबंधित यंत्रणांचा समावेश आहे. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शासनाच्या निकषांनुसार बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याची प्रक्रिया पुढे जाईल.

त्यामुळे सध्या महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर झालेला नसला तरी दुष्काळसदृश परिस्थितीचे गांभीर्य वाढले आहे. प्रशासनाकडून पावसाची तूट, पीकस्थिती, पाणीसाठा आणि इतर तांत्रिक निकषांचा आढावा घेतला जात असून, त्यानंतरच दुष्काळाबाबत अंतिम निर्णय होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT