Bihar Election Result : बिहारमध्ये एनडीएने दणदणीत बहुमत मिळवले आहे. याचे परिणाम महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर होतील, त्याचबरोबर महायुतीतील इतर २ घटक पक्षांची बार्गेनिंग पॉवर कमी होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. त्याचवेळी हा निकाल महाविकास आघाडीला एकसंध करण्याचे कारण ठरू शकतो, असाही सूर व्यक्त केला जात आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीएने २०० हून अधिक जागा जिंकत सत्ता मोठ्या बहुमताने राखली आहे. महाराष्ट्राप्रमाणेच भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून नितीश कुमार यांचा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे. विरोधी पक्षाने निवडणुका अत्यंत नियोजनबद्ध आणि ताकदीने लढवूनही त्यांचा पराभव झाल्याने विरोधकांमध्ये निराशेचे वातावरण आहे.
दुसरीकडे, भाजप कार्यकर्ते या स्थानिक निवडणुका अधिक उत्साह व जोमाने लढवतील, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. बिहारच्या विजयामुळे निर्माण झालेल्या राजकीय वातावरणाचा महायुतीला फायदा होईल, असा अंदाजही बहुतांश राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.
बार्गेनिंग पॉवर वाढणार :
हरियाणा, महाराष्ट्र पाठोपाठ बिहारमध्ये भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. बिहारमध्ये मिळालेल्या अभुतपुर्व यशामुळे महाराष्ट्रात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागावाटपात भाजपचा वरचष्मा असेल, यासोबत महायुतीच्या इतर घटक पक्षाची बार्गेन पॉवर घटण्याचा धोका राजकीय तज्ञांनी व्यक्त केला आहे. या निकालामुळे शिवसेना व अजित पवारांचा पक्ष बॅकफूटला जाण्याची शक्यता आहे. पुणे जमिन घोटाळा प्रकरणी त्याची चूणूक दिसली होती.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे हरीष वानखेडे यांनीही या निरीक्षणाला दुजोरा दिला. ते म्हणाले, मतदानाची टक्केवारी वाढूनही बिहारमध्ये विरोधी पक्षाला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. भाजपला निवडणुका जिंकण्याचा ‘फॉर्म्युला’ मिळाला आहे. जोपर्यंत त्याची तोड विरोधकांकडे तयार होत नाही, तोपर्यंत परिस्थितीत मोठा बदल होणार नाही. विधानसभा निकालाप्रमाणेच महाराष्ट्रातील स्थानिक निवडणुकामध्ये भाजपचा वरचष्णा राहील,असे चित्र आहे.
ओ. पी. जिंदाल ग्लोबल विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. सुमित म्हसकर यांनी या निकालानंतर महाविकास आघाडीला एकत्र येण्याचा सल्ला दिला. बिहारचा निकाल सांगतो की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला एकत्र यावेच लागेल. केवळ आघाडी करून चालणार नाही; घटक पक्षातील अंतर्गत समन्वय मजबूत असावा लागेल. नियोजनही अधिक सूक्ष्म करावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.
ईव्हीएमच्या घोळाचा मुद्दा आता संपला आहे. आता विरोधकांनी लोकांना भावतील असे मुद्दे उचलले, तर त्यांना संधी आहे.काँग्रेसने वेगळे लढण्याची खुमखुमी दाखवली तर ते त्यांच्या पायावर धोंडा मारुन घेतील, असे निरीक्षण राजकीय विश्लेषक प्रताप आसबे यांनी नोंदवत काँग्रेसला फटकारले.
निकालावर बोलताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले, बिहारमध्ये सुशासनासाठी जनतेने स्पष्ट कौल दिला आहे. या निकालामुळे महाराष्ट्रातील मतदारांच्या मनातली अस्पष्टता दूर होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल.
तर बिहारच्या निकालाने निराश आहोत, पण हताश नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमर काळे यांनी व्यक्त केले. तसेच नगरपरिषद आणि जिल्हा परिषद निवडणुका स्थानिक मुद्यांवर लढवल्या जातात. त्यामुळे आम्ही कमबॅक करू, असा आम्हाला विश्वास आहे, असेही सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.