Prashant Koratkar Sarkarnama
महाराष्ट्र

Prashant Koratkar : कोरटकर कोण आहे? तो कसा पळाला अन् कसा सापडला? 29 दिवसांची A टू Z कुंडली

Prashant Koratkar News : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणारा इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर अखेर जाळ्यात अडकला.

Hrishikesh Nalagune

Prashant Koratkar News : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणारा इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर अखेर जाळ्यात अडकला. सोमवारी (24 मार्च) तेलंगणामधून त्याला ताब्यात घेण्यात आले. आज (25 मार्च) त्याला कोल्हापूर सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्याला न्यायालयाने 28 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

यामुळे कोरटकरला पकडण्यासाठी मागील एक महिन्यापासून सुरू असलेला चोर पोलिसांचा खेळ अखेर संपला आहे. त्याला न्यायालयात नेताना कोल्हापूरच्या रस्त्यावर शिवप्रेमींचे आंदोलन सुरु असल्याने कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागला होता. त्यातही आंदोलकांनी त्याच्यावर चिल्लर फेकण्याचा प्रयत्न केला. न्यायालयातून बाहेर आल्यानंतर त्याच्या अंगावर चप्पलही फेकण्याचा प्रयत्न केला. यातून शिवप्रेमींचा कोरटकरबद्दल किती राग होता याचा अंदाज येऊ शकतो.

पण एक महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देणारा हा प्रशांत कोरटकर नेमका आहे तरी कोण? तो कसा पळाला? आणि कसा सापडला? याचीच ही संपूर्ण स्टोरी...

प्रशांत कोरटकर कोण आहे?

प्रशांत कोरटकर हा मुळचा वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील रहिवासी. पण मागील अनेक वर्षांपासून त्याचे वास्तव चंद्रपूरमध्ये आहे. चंद्रपुरच्या सरदार पटेल महाविद्यालयातील जनसंवाद विद्या विभागात तासीका तत्वावर काम करतो. त्याला बड्या लोकांचे आकर्षण आणि सोशल मीडियाचे प्रचंड वेड असल्याचे दिसून येते. पोलीस अधिकाऱ्यांशी फोटो काढून ते सोशल मीडियावर पोस्ट करायचा.

25 फेब्रुवारीला धमकी :

याच प्रशांत कोरटकरने 25 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री आधी कॉल करून आणि नंतर समाज माध्यमातून आपल्याला धमकी दिल्याचा दावा इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी केला. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांच्याबद्दलही आक्षेपार्ह विधान केल्याचा दावाही त्यांनी केला. याबाबत त्यांनी एक ऑडिओ क्लिपही व्हायरल केली होती.

यात फोनवर बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत मराठा समाजाबाबत चेतावणीखोर वक्तव्य केले होते. ''कितीही मराठे एकत्र कर तुम्हाला ब्राह्मणांचा ताकद दाखवू, असे संभाषण या कॉल रेकॉर्डिंगमध्ये करण्यात आले होते. याच रेकॉर्डिंगमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही उल्लेख केला होता. ही क्लिप व्हायरल होताच मराठा समाजामध्ये तीव्र संताप उसळला. कोरटकरविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी अशी मागणी जोर धरू लागली.

मराठा समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेऊन कोरटकरला पोलीस संरक्षण देण्यात आले. त्यावेळी सावंत यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनीच या प्रकरणात लक्ष घालावे अशी मागणी केली. फडणवीसांच्या आदेशानुसार जुना राजवाडा पोलिसांनी कोरटकरविरुद्ध गुन्हा दाखल केला. महापुरुषांचा अवमान करून जातीय तेढ वाढवणे, धार्मिक भावना दुखावणे अशा कलमान्वये गुन्हा दाखल झाला. पण गुन्हा दाखल होताच कोरटकरने पळ काढला.

26 फेब्रुवारीला पळ काढला :

गुन्हा दाखल होताच 26 फेब्रुवारी रोजी पोलिसांची सुरक्षा असतानाही कोरटकर पळाला. 27 फेब्रुवारीला त्याने आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आदर आहे असं सांगणारा आणि आपण धमकी दिली नसल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ व्हायरल केला. 26 फेब्रुवारीला पळ काढल्यानंतर तो आधी शेजारील मध्यप्रदेशात गेल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे नागपूरसह त्याचा शोध मध्यप्रदेशमध्ये घेतला गेला. मात्र तो तेथे सापडला नाही.

त्याचवेळी वकिलांमार्फत कोरटकर याने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला. 28 फेब्रुवारी रोजी कोल्हापूर न्यायालयाने त्याला अंतरिम जामीन मंजूर केला. या दरम्यान, पोलिसांनी त्याचा फोन तपासणीसाठी मागितला असता त्याने फोन फॉरमॅट करून दिला असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच त्याला जामीन देताना कोल्हापूर न्यायालयाने आपली बाजू ऐकून घेतली नाही, असा दावा करत पोलिसांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.

यावेळी उच्च न्यायालयाने पोलिसांची बाजू ऐकून घेऊन अटकपूर्व जामिनाचा निर्णय द्या, असे निर्देश कोल्हापूर न्यायालयाला दिले. त्यानुसार, 11 मार्चच्या सुनावणीवीही त्याला 17 मार्चपर्यंत दिलासा मिळाला. पण 18 मार्चच्या सुनावणीवेळी त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. त्यावेळी कोटकरने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला.

या दरम्यान, त्याने सोशल मीडियावर दुबईमधील काही फोटो व्हायरल केले. त्यामुळे तो दुबईला पळाल्याचे बोलले गेले. पण कोल्हापूर पोलिसांनी त्याचा पासपोर्ट नागपूर पोलिसांमार्फत जमा करून घेतला. त्यामुळे तो भारतातच असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर तो चंद्रपूरमध्ये असल्याचे सांगितले जाऊ लागले. माध्यमांमध्येही याबाबतचे वृत्त प्रकाशित झाले.

चंद्रपूरमधून मिळाली टीप :

'सकाळ' वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, कोरटकर हा चंद्रपूरमधील हॉटेल सिद्धार्थ प्रीमियर येथे मुक्कामी होता. 11 मार्च रोजी त्याने हॉटेलात प्रवेश केला. ऑनलाईन क्रिकेट सट्टाचे काम करणारा बुकी धीरज चौधरी याने त्याची हॉटेलातील सर्व व्यवस्था केली होती. यावेळी त्याच्यासोबत प्रशिक पडवेकर हादेखील होता.

याबाबतचे वृत्त सकाळमध्ये प्रकाशित झाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी हॉटेलची चौकशी केली. तसेच कोल्हापूर पोलिसांनाही याबाबतची माहिती दिली. यावेळी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, स्थानिक पोलिसांनी बुकी चौधरी याची कसून चौकशी केली. या चौकशीत कोरटकर हा एसयुव्ही महेंद्रा 700 या गाडीने तेलंगणा येथे पळून गेल्याची माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारावर कोल्हापूर पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. कोरटकर ज्या मार्गाने गेला त्या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज तसेच लक्कडकोट नाक्यावरील आणि हैद्राबाद मार्गावरील सर्व पथकर नाके व इतरत्र लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेजदेखील तपासण्यात आले. त्याचा विश्वासू सहकारी प्रशित फिरताना दिसून आला. यामुळे तो तेलंगणात असणार अशी पोलिसांची पक्की खात्री झाली. त्या पद्धतीने रेल्वे स्थानकाच्या परिसरात सर्च ऑपरेशन राबवत कोरटकरला ताब्यात घेतले.

उच्च न्यायालयातील सुनावणीपूर्वीच अटकेची बातमी :

24 मार्च 2025 रोजी उच्च न्यायालयात दुपारी 3 वाजता कोरटकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होणार होती. पण त्यापूर्वी दुपारी 2 वाजून 45 मिनिटांनी पोलिसांनी कोरटकरला अटक घेतल्याची माहिती न्यायालयाला दिली. त्यामुळे अटकपूर्व अर्जाची सुनावणीच गुंडाळण्यात आली. आता कोल्हापूर न्यायालयाने त्याला 28 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलीस तपासात राजकीय धागेदोरे मिळणार?

कोरटकर याला या संपूर्ण काळात कोणाचा राजकीय वरदहस्त होता का? त्याला भेटून गेलेला पोलिस अधिकारी कोण, संबंधित अधिकाऱ्याने कोरटकर याला तेलंगणा राज्यात पळून जाण्यासाठी मदत केली का? याचीही चौकशी पोलिस करणार आहे. भाजप आमदार परिणय फुके यांनी कोरटकर तेलंगणामध्ये काँग्रेस आमदाराच्या मदतीने थांबला होता असा आरोप केला आहे. याचाही पोलीस तपास करणार असल्याची माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT