भाजप नेत्याला ईडीचा मोठा धक्का बसला असून नवी मुंबईतील सरकारी जमिनीच्या घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात ईडीने आतापर्यंत सुमारे ७० कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली असून त्यामध्ये १८ कोटी रुपयांचे भूखंड सील करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
ईडीच्या तपासात भाजप नेते जे.एम. म्हात्रे यांचे नाव समोर आले आहे. मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली ईडीने सोमवारी त्यांच्या मालकीच्या अनेक मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली. रायगड जिल्ह्यातील उरण आणि उलवे परिसरातील म्हात्रे यांची जमीन आणि इतर मालमत्ता या कारवाईत समाविष्ट आहेत. या जमिनींची एकूण किंमत अंदाजे १८ कोटी रुपयांच्या आसपास असून, आतापर्यंत जप्त करण्यात आलेली एकूण संपत्ती ७० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
ईडीकडून मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल तालुक्यातील मौजे वहाळ येथील काही जमिनी सरकारी रेकॉर्डमध्ये वन विभागाच्या मालकीच्या म्हणून नोंद आहेत. मात्र, या जमिनी बेकायदेशीर पद्धतीने खासगी व्यक्तींच्या नावावर हस्तांतरित केल्या गेल्याचा आरोप आहे. या गैरव्यवहारातून कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फायदा घेतल्याचा संशय ईडीने व्यक्त केला आहे. याच आर्थिक व्यवहारांमधून मनी लाँड्रिंग झाल्याचा आरोप तपासात समोर आला आहे.
ईडीच्या मुंबई विभागीय कार्यालयाने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा, २००२ अंतर्गत तात्पुरता जप्ती आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार उरण आणि उलवे येथील जे.एम. म्हात्रे यांच्या तीन स्थावर मालमत्तांवर जप्ती आणण्यात आली आहे. या मालमत्ता म्हात्रे आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर नोंद आहेत. त्यांची एकत्रित किंमत सुमारे १७.७४ कोटी रुपये असल्याचे ईडीने सांगितले आहे. तपास पूर्ण होईपर्यंत या जमिनी विक्री किंवा हस्तांतरासाठी वापरता येणार नाहीत.
हे संपूर्ण प्रकरण रायगड जिल्ह्यातील पनवेल पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका एफआयआरमधून उघडकीस आले. सरकारी कागदपत्रांमध्ये फेरफार करून वनविभागाच्या जमिनी खासगी मालकीच्या दाखवण्यात आल्याचा आरोप आहे. पुढे या जमिनी नवी मुंबईतील विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी सरकारकडून संपादित करण्यात आल्या. मात्र, या संपादनाची भरपाई सरकारकडे जाण्याऐवजी संबंधित खासगी व्यक्तींना मिळाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
जे.एम. म्हात्रे हे रायगड जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात परिचित नाव आहे. ते अनेक वर्षे शेतकरी आणि कामगार पक्षात कार्यरत होते. २०१५ साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पनवेल नगर परिषदेचे प्रमुख म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. सध्या ईडी या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, यात आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.