Ram Kadam, Anil Deshmukh
Ram Kadam, Anil Deshmukh sarkarnama
महाराष्ट्र

वसुलीचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी देशमुखांना पुन्हा गृहमंत्री करायचयं?

सरकारनामा ब्युरो

मुंबई : ''काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या लोकांना वेगवेगळ्या यंत्रणांच्या माध्यमातून अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. माजी गृहमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना तुरुंगात टाकले, त्यांच्या प्रत्येक तासाची किंमत आज ना उद्या भाजपला मोजावी लागले,'' असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी बुधवारी नागपूर येथे दिला. पवारांच्या या इशारा भाजपचे नेते राम कदम (BJP leader Ram Kadam) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

राम कदम म्हणाले, ''संधी मिळेल, तेव्हा भाजपाचा हिशेब चुकता करू,असे शरद पवार म्हणतात. पण 15 वर्ष राज्यात त्यांची सत्ता होती. केंद्रात 10 वर्ष त्यांची सत्ता होती. तेव्हा आणि आता काहीही सापडले नाही. शरद पवार म्हणाले अनिल देशमुख पुन्हा परत येतील आणि त्याच जागेवर त्यांना बसवायचे आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की, अजून वसुलीचे टार्गेट पूर्ण झालेले दिसत नाही.जनतेच्या मनात एक प्रश्न आहे की तीन पक्षाच्या सरकारचं वसुलीचं टार्गेटअजून पूर्ण झालेले नाही, म्हणून अनिल देशमुखांना पुन्हा गृहमंत्री करायचं आहे का?''

''संधी कशाची शोधता? आजही राज्यात तुमची सत्ता आहे. आमच्याकडे वसुली, खंडणी, बदल्यांचे रॅकेट यापैकी काहीही नाही. कर नाही त्याला डर कशाला? तुम्हाला कुणी अडवलं आहे,'' असा सवाल राम कदमांची उपस्थित केला आहे.

राजकारणाचा प्लॅटफॅाम ही सेवेची संधी आहे, गरीबांची सेवा करण्याची संधी आहे. समाजकारणाची संधी आहे, लोकांचे कल्याण करण्याची संधी आहे. भाजपचा कार्यक्रर्ता हा कर्मठ, त्यागपूर्ण जीवन जगणारा कार्यक्रर्ता आहे. राजकारणाला पैसै कमविण्याचे दुकान समजणारा नाही, या भावनेने आम्ही काम करतो. मागच्या दोन वर्षात वसुली कांड, बदल्यामध्ये भष्ट्राचार, वेगवेगळ्या करारमधील टक्केवारी, हे महाराष्ट्रानं उघड्या डोळ्यानं पाहिलं आहे, यांच्यावर आपण कधी भाष्य करणार आहात, असे कदम म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात बुधवारी शरद पवार म्हणाले, ''आज देशमुख तुरुंगामध्ये आहेत हे कशामुळे घडले तर एका आयुक्तांच्या तक्रारीमुळे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारने चौकशी केली. आज ते पोलिस आयुक्त कुठे आहेत, असा सवाल पवार यांनी केला. त्यांना राज्य सरकारने फरार घोषीत केले आहे. अनिल देशमुख प्रकरणात केंद्र सरकारने सत्तेचा गैरवापर केला, असा आरोप त्यांनी केला. एकनाथ खडसे विरोधी पक्षनेते होते. अनेक वर्षे भाजपचे नेतृत्व केले. ते राष्ट्रवादीमध्ये आले त्यानंतर त्यांच्यावर आणि त्यांच्या पत्नीवर खटले भरले गेले. काही नसताना एकनाथ खडसे यांची ही अवस्था केली गेली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर काही करता येत नाही म्हणून नातेवाईकांच्या घरी लोक पाठवले. त्या तपासात काही मिळाले नाही, तरी त्यांनी पाच दिवस घर सोडले नाही. त्या अधिकाऱ्यांनी सांगितले की पाच दिवस हलायचे नाही असे दिल्लीचे आदेश आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT