Dadarao Keche, Sanjay Kenekar, Devendra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

BJP : अवघ्या वर्षभराची आमदारकी... केचे अन् केनेकरांना खूश केलं की तोंडाला पाने पुसली?

BJP : विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपने आर्वीचे माजी आमदार दादाराव केचे, नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी आणि छत्रपती संभाजीनगरचे माजी उपमहापौर संजय केनेकर यांना संधी दिली आहे.

Hrishikesh Nalagune

BJP News : एखाद्याला थोडंच काही तरी द्यायचं किंवा प्रत्यक्षात काही द्यायचं नाही, पण बरेच काही देऊ केल्याचा आभास निर्माण करायचा, या चालाखीलाच तोंडाला पाने पुसणे अशी म्हण रूढ झाली. असाच काहीसा प्रकार भाजपने विधान परिषदेसाठी उमेदवारी दिलेल्या दादाराव केचे आणि संजय केनेकर यांच्याबाबतीत झाला आहे का? असा सवाल विचारला जात आहे. यांच्या आमदारकीची केवळ एका वर्षासाठी असणारी मुदत हे या प्रश्नाचे मुख्य कारण आहे.

विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपने आज (16 मार्च) तीन उमेदवारांची घोषणा केली आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वीचे माजी आमदार दादाराव केचे, नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी आणि छत्रपती संभाजीनगरचे माजी उपमहापौर संजय केनेकर यांना भाजपने संधी दिली आहे. उद्या (17 मार्च) हे तिघेही विधान भवनात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र या तिघांनाही मे 2026 पर्यंतच मुदत असलेली आमदारकी मिळणार आहे.

2020 मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत प्रवीण दटके, रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर विजयी झाले होते. त्यांच्या आमदारकीची मुदत मे 2026 पर्यंत होती. मात्र हे तिघेही विधानसभेवर निवडून आल्यानंतर या जागा रिक्त झाल्या आहेत. याच जागांवर आता केचे, जोशी आणि केनेकर यांना संधी दिली आहे. त्यामुळे या तिघांच्याही आमदारकीची मुदत 2026 पर्यंतच असणार आहे. त्यानंतर पक्षाने त्यांना पुन्हा संधी दिली तर ते आमदार म्हणून पुढे राहु शकतात. अन्यथा एका वर्षाचे आमदार म्हणून मिरविण्याची वेळ तिघांवरही येऊ शकते, एवढे नक्की.

एका वर्षाच्या आमदारकीने केचे, केनेकरांवर अन्याय?

दादाराव केचे हे भाजपचे ज्येष्ठ नेते. मागील अनेक वर्षांपासून ते पक्षात सक्रिय आहेत. 2009 मध्ये त्यांनी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या आर्वी मतदारसंघातून विजय मिळविला. केचे यांच्या विजयापूर्वी तिथे सलग 6 वेळा काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला होता. 2014 मध्ये त्यांचा पराभव झाला पण 2019 मध्ये त्यांनी भाजपला या मतदारसंघात पुन्हा विजय मिळवून दिला.

गत तीन वर्षांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक सुमीत वानखेडे यांनी आर्वी मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी तयारी सुरू केली. फडणवीसांनी त्यांची इच्छाही पूर्ण केली. केचे यांचे तिकीट कापून वानखेडे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे केचे नाराज होते. त्यांनी बंडाचा इशाराही दिला होता. पण पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांचे बंड थंड झाले होते. आता केचे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला केवळ एका वर्षाची आमदारकी देऊन त्यांचे पुनर्वसन केले आहे.

संजय केनेकर यांनाही एका वर्षाची आमदारकी देऊन त्यांच्याही तोंडाला भाजपने पानं पुसल्याचे बोलले जाते. केनेकर हे 1990 च्या आधीपासून पक्षात सक्रिय आहेत. छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यात त्यांचं मोठं संघटनात्मक काम आहे. आतापर्यंत त्यांनी नगरसेवक आणि शहराचे उपमहापौरपद संभाळलं आहे. 2021 मध्येही केनेकर यांना विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी संधी दिली होती. पण राजकीय तडजोडीत त्यांना माघार घ्यावी लागली होती.

त्यानंतर 2024 च्या विधानसभा निवडणुकीतही ते उमेदवारीसाठी आग्रही होते. मात्र अंतिम क्षणी अतुल सावे यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली. तेव्हा पक्षवाढीसाठी झटणाऱ्या केनेकर यांचे पुनर्वसन मोठ्या पदावर होईल असे सांगून त्यांची आणि कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात आली होती. मात्र केवळ एका वर्षाच्या आमदारकीची माळ त्यांच्या गळ्यात घालण्यात आल्याने कार्यकर्ते नाराज असल्याचे दिसून येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT