Maharashtra BJP Politics News Sarkarnama
महाराष्ट्र

Loksabha Election 2024 : मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचंय, भाजपची ४८ लोकसभा मतदारसंघात तयारी...

Shivsena-NCP : पक्षाच्या या तयारीने मित्रपक्षामध्ये मात्र अस्वस्थता असून, शिंदे गटाच्या विद्यमान खासदारांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे.

Prasad Shivaji Joshi

Maharashtra Politics News : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपने राज्यात `मिशन ४५ प्लस`, हाती घेतल्याचे सांगितले. यासाठी सर्व प्रकारच्या तडजोडी करण्याची पक्षाची तयारी असल्याचे नुकत्याच झालेल्या राज्यातील घडामोडींवरून दिसून आले आहे. (Maharashtra News) एकीकडे महायुती म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच लोकसभा निवडणुका लढवल्या जातील, असे भाजपचे नेते सांगतात. तर दुसरीकडे मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचे असल्याने कुठलीही जोखीम न पत्करता स्वतंत्रपणे राज्यातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्याची तयारीही पक्षाने सुरू केल्याचे दिसते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने हालचाली गतिमान केल्या असून, राज्यातील संपूर्ण ४८ लोकसभा मतदारसंघांत उमेदवार उभे करण्याच्या दृष्टीने कामाला लागण्याचे आदेश दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (BJP) पक्षाच्या या तयारीने मित्रपक्षामध्ये मात्र अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता आहे. शिंदे गटाच्या विद्यमान खासदारांमध्ये असुरक्षिततेची भावना बळावते आहे.

राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांतील तयारीचा आढावा घेण्यासाठी सोमवारी (दि. १६) पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत बैठक झाली. (Shivsena) या बैठकीस राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांचे समन्वयक व प्रभारी उपस्थित होते. (NCP) तसेच प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील विधानसभानिहाय आढावा बैठकीत घेण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी सर्वसामान्य जनतेसोबत संवाद साधावा. केंद्र शासनाने राबवलेल्या योजनेची माहिती, विकासकामाबाबत त्यांच्याशी संवाद साधावा. यासाठी समाजमाध्यमांचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन विनोद तावडे यांनी लोकसभा समन्वयक आणि प्रभारींना केले. २०२४ ची लोकसभा निवडणूक महायुती म्हणून लढवली जाईल, असे वक्तव्य भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी वारंवार केले आहे.

महायुतीमध्ये भाजपसोबत शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट या प्रमुख पक्षांसह अन्य पक्षांचा समावेश आहे. शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार : डॉ. श्रीकांत शिंदे (कल्याण), गजानन किर्तीकर (उत्तर पश्चिम मुंबई), राहुल शेवाळे (दक्षिण मध्य मुंबई) , भावना गवळी (यवतमाळ), हेमंत पाटील (हिंगोली), धैर्यशील माने (हातकणंगले), हेमंत गोडसे (नाशिक), संजय मंडलिक (कोल्हापूर), राजेंद्र गावित (पालघर), श्रीरंग बारणे (मावळ), सदाशिव लोखंडे (शिर्डी), प्रताप जाधव (बुलडाणा), कृपाल तुमाणे (रामटेक).

तर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे सुनील तटकरे (रायगड) यांचा महायुतीत समावेश आहे. शिवसेना शिंदे गटाचे व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाचे विद्यमान खासदार असलेल्या या १४ लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचा दावा असणार आहे. मात्र, या ठिकाणी भाजपने उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. पक्षाने नुकतेच नेमलेल्या लोकसभा समन्वयकाकडे लोकसभा निवडणुकीचे संभाव्य उमेदवार म्हणून बघितले जात आहे. त्यातच पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी सर्व लोकसभा समन्वयकांची बैठक घेऊन आढावा घेतल्याने मित्रपक्षात अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT