Former President Pratibha Patil sarkarnama
महाराष्ट्र

माजी राष्ट्रपती प्रतिभाताईंच्या माहेरात काँग्रेस संपुष्टात

बोदवड हे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील (Pratibha Patil) यांचे माहेर आहे. आता त्या ठिकाणी काँग्रेस संपुष्टात आली आहे.

कैलास शिंदे : सरकारनामा

जळगाव : जिल्हयातील बोदवड नगरपंचातीच्या निवडणूक (Nagar Panchayat elections)निकालाने अनेक दिग्गजांना धक्का दिला आहे. काँगेसला (Congress) एकही जागा जिंकता आली नाही. बोदवड हे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील (Pratibha Patil) यांचे माहेर आहे. आता त्या ठिकाणी काँग्रेस संपुष्टात आली आहे.

बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेने जोरदार मुसंडी मारत १७ पैकी ९ जागा जिंकून बहुमत मिळवित सत्ता मिळविली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ ७ जागा मिळाल्या भारतीय जनता पक्षाला देखील यश मिळाले नाही. त्यांचा एक उमेदवार चिठ्ठीवर विजयी झाला आहे. काँग्रेस पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही.

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील नाडगाव येथे झाला आहे. आता निवडणूक झालेली बोदवड नगरपंचायत नाडगाव येथून अवघ्या ५ किलो मीटर अंतरावर आहे.

बोदवड प्रतिभाताई पाटील यांच्या कार्यकाळात बालेकिल्ला होता. याच मुक्ताईनगर त्या काळी एदलाबाद मतदार संघावर प्रतिभाताई पाटील यांची जबरदस्त पकड होती. त्यामुळे काँग्रेस पक्षाला हरविणं कठीण होते. मात्र, भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेनंतर एकनाथ खडसे यांनी या मतदार संघात काँगेसला धोबपछाड दिली, ती पुढे तीस वर्षे या विधानसभा मतदार संघात काँग्रेसला यश मिळाले नाही.

बोदवड ग्रामपंचायतीमध्ये असलेली काँगेस पक्षाची सत्ता संपुष्टात आली. मात्र, आजपर्यंत व आता नगरपंचायत झाल्यानंतरही काँग्रेस पक्षाचे एक दोन सदस्य तरी निवडून येत होते. मात्र, या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने दहा जागा लढविल्या मात्र एकही जागा जिंकता आली नाही. काँग्रेस पक्षाचा संपूर्णपणे सुपडा साफ झाला आहे. ज्या तालुक्याने देशाला काँगेस पक्षाच्या माध्यमातून देशाला पहिल्या महिला राष्ट्रपती दिल्या. त्याच ठिकाणी आज काँग्रेस संपुष्टात आली आहे. बोदवड नगरपंचायत आज शिवसेनेच्या ताब्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना धक्का देत शिवसेनेने बोदवड नगरपंचायत वर आपले वर्चस्व निर्माण केले आहे. त्यामुळे शिवसेनेचे (Shivsena) आमदार चंद्रकांत पाटील यांनी खडसे यांना राजकीय धक्का दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात बोदवड नगरपंचायत आहे,खडसे भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील झाल्यानंतर प्रथमच त्यांच्या मतदार संघात या नगरपंचायतीची निवडणूक झाली.

या निवडणुकीत एकनाथ खडसे व त्यांच्या कन्या रोहिनी खडसे यांनी ताकद लावली होती.तर शिवसेना नेते जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार चंद्रकात पाटील यांनीही जोरदार प्रचार केला होता. एकनाथ खडसे यांना या निकालाने मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेने बाजी मारली आहे.तर भाजपचे गिरीश महाजन यांनाही धक्का बसला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT