BJP Politics; Ravindra Chavan sarkarnama
महाराष्ट्र

Bjp News : भाजपमधील वाद विकोपाला! प्रदेशाध्यक्षांनी टेकले हात; आता थेट दिल्लीतून 'सर्जिकल स्ट्राईक'? नेमकं काय घडलं

BJP conflict News : भाजपमधील अंतर्गत वाद थांबायचे काही केल्या नाव घेत नाही. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार व आमदार किशोर जोरगेवार यांच्यातील संघर्ष विधानसभा निवडणुकीपासून सुरू आहे.

सरकारनामा ब्युरो

Nagpur News : चंद्रपूर भाजपमधील अंतर्गत वाद थांबायचे काही केल्या नाव घेत नाही. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार व आमदार किशोर जोरगेवार यांच्यातील संघर्ष विधानसभा निवडणुकीपासून सुरू आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीतही मुनगंटीवार-जोरगेवार वादामुळे भाजपला बहुमत मिळाले नाही. त्यामुळे सत्ता स्थापन करीत असताना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मदत घ्यावी लागली आहे. त्यावेळेस पासून या दोन गटातील संघर्ष वाढला आहे.

मुनगंटीवार-जोरगेवार यांच्यातील संघर्ष सोडवण्यात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही हतबलता व्यक्त केली आहे. चंद्रपूरमधील हा वाद माझ्या आटोक्याबाहेर असून, आता याचा निर्णय थेट दिल्लीतूनच घेतला जाईल, असे संकेत चव्हाणांनी नागपुरातील भेटीत दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

चंद्रपूर भाजपमधील (BJP) गटबाजी आणि अंतर्गत वाद आता शिगेला पोहोचला आहे. त्याचे पडसाद नुकत्याच पार पडलेल्या चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या झोन समिती आणि महिला बालकल्याण समितीच्या निवडणुकांमध्ये दिसून आले. त्यामुळे या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला. संख्याबळ अनुकूल असतानाही मुनगंटीवार-जोरगेवार वादामुळे भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांनी शुक्रवारी संध्याकाळी नागपूर गाठून 17 समर्थक नगरसेवकांसह प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली होती. त्या भेटीनंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही हतबलता व्यक्त केली आहे.

चंद्रपूर भाजपमधील नेत्याने भेट दिल्यानंतर रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी या घडामोडींवर स्पष्ट नाराजी व्यक्त केली. यावेळी रवींद्र चव्हाण यांनी चंद्रपुरातील वाद हा माझ्या आटोक्याबाहेर आहे. चंद्रपुरात कोणताही नेता निरीक्षक म्हणून जाण्यास तयार नाही. त्यामुळे आता चंद्रपुरातील निर्णय हे दिल्लीतच घेतले जातील. आमच्याकडे आलेले प्रत्येक विषय आम्ही दिल्लीला पाठवू आणि तिथूनच यावर निर्णय घेतल्या जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच माजी राज्यमंत्री मदन येरावार यांची चंद्रपूर भाजपच्या निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यातील टोकाच्या संघर्षामुळे त्यांनी चंद्रपुरात येण्याऐवजी आपल्या पदाचा राजीनामा देणे पसंत केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कॊणताही नेता या ठिकाणी निरीक्षक म्हणून काम करण्यास तयार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार हे पक्षातील ज्येष्ठ नेते आहेत. रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक नेत्यांनी मुनगंटीवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष असताना यांच्या नेतृत्वात काम केले आहे. त्यामुळे मुनगंटीवार यांच्या विरोधात किंवा त्यांच्याशी संबंधित वादात पडायला राज्यातील कोणताही नेता तयार नसल्याचे चित्र सध्या भाजपमध्ये पाहायला मिळत आहे. या सर्व प्रकारामुळे चंद्रपूर भाजपमधील पेच अधिकच वाढला आहे. त्यामुळे येत्या काळात भाजपमधील हा तिढा सोडवण्यासाठी काय उपाययोजना केल्या जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT