Yeola News: मंत्रिपदासाठी ऐनवेळी पत्ताकट करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात उघडपणे थयथयाट केला होता. अधिवेशनापासून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे मेळावे,बैठका यांनाही त्यांनी दांडी मारल्याचं दिसून आलं होतं. पण धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर मंत्रिपदाची माळ पुन्हा एकदा गळ्यात पडताच भुजबळांचा रोष कमी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र,आता आरक्षणाबाबतच्या भूमिकेवरुन पुन्हा एकदा छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) थेट अजित पवारांशीच पंगा घेतल्याचं समोर येत आहे.
राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटला आहे. यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्याला त्याला त्याच्या मागणीप्रमाणे आणि त्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण मिळावे, त्याला आमचं दुमत असण्याचं कारण नसल्याची भूमिका मांडली. पण आता हीच अजितदादांची भूमिका भुजबळांना चांगलीच खटकली आहे.
मंत्री छगन भुजबळ यांनी येवला तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या भागांची पाहणी केल्यानंतर गुरुवारी (ता.25) मीडियाशी संवाद साधला. यावेळी भुजबळ अजित पवारांच्या आरक्षणाविषयीच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले,आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. मराठा एक समाज, एक जात आहे. ओबीसी हा वर्ग आहे. यात अनेक जाती आहेत. त्यासाठी हे आरक्षण असल्याचं भुजबळांनी अजितदादांना प्रत्युत्तर देताना म्हटलं आहे.
तसेच ओबीसी समाज हा सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे. त्यामुळे आर्थिक दृष्टीनं आरक्षण देण्याला आमचा विरोध असल्याचं भुजबळांनी ठणकावतानाच उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) वक्तव्यालाही तीव्र विरोध दर्शवला आहे.
भुजबळ म्हणाले, राज्यावर अस्मानी, सुलतानी संकट आले आहे. शेतकरी रडत आहेत.पण जेवढी जास्त मदत करता येईल, तेवढी शेतकऱ्यांना करणार आहोत. सरकार अतिशय मजबूतपणे शेतकऱ्यांच्या पाठीमागं उभं असल्याचं त्यांनी म्हटलं.
काही ठिकाणी जमिनी खरडून गेल्या आहेत. काही ठिकाणी द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. द्राक्षबागा पुन्हा उभ्या करण्यासाठी तीन-चार वर्षे जाणार आहेत. प्राथमिक मदतीला सुरुवात झालेली आहे. शेतकऱ्यांच्या पाठीमागं पूर्ण महाराष्ट्र उभं राहणं आवश्यक आहे, असंही मंत्री छगन भुजबळांनी यांनी यावेळी सांगितलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा विरुद्ध ओबीसी यांचा संघर्षावर मोठी प्रतिक्रिया दिली होती. राजकारण करताना मी कधीही जात-पात किंवा नात्याचा विचार करत नाही. मी फक्त माणूस पाहतो आणि मदत करतो. काही लोक जातीचे वेड डोक्यात घालण्याचा प्रयत्न करतात आणि समाजामध्ये तेढ निर्माण करत असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं होतं.
पण छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले होते. ज्याला त्याला त्याच्या मागणीप्रमाणे आणि त्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण मिळावे, त्याला आमचा दुमत असण्याचे कारण नाही. जे कोणी यातून राजकारण करत असतील, त्यांना आवर घालण्याची गरज असल्याचंही अजित पवारांनी म्हटलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.