Ambadas Danve Sarkarnama
महाराष्ट्र

Ambadas Danve News: अंबादास दानवेंनी भाजप सभापतीपदाच्या उमेदवाराची धरली गचांडी! भाजपाकडून सदस्य पळवा पळवी...

Chhatrapati Sambhajinagar Panchayat Samiti Election: सभापती, उपसभापती पद मिळवण्यासाठी भाजपाच्या उमेदवाराने शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाच्या तीन सदस्यांना आपल्या बाजूने वळवल्याची कुणकुण अंबादास दानवे यांना लागली होती.

Jagdish Pansare

Shivsena UBT News : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भाजपाने चांगले यश मिळवले. 23 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाने आज पंचायत समिती सभापती, उपसभापतीपदासाठी जोरदार फिल्डिंग लावली. शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाच्या तीन सदस्यांना गळाला लावून भाजपाने सत्तेचे गणित जुळवून आणले.

आपल्या सदस्यांना गायब केल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांना समजताच त्यांनी भाजपा सभापती पदाचे उमेदवार कल्याण गायकवाड यांची गचांडी धरत त्यांना कानफटावले. यामुळे भाजपा-शिवसेना ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती सभापती, उपसभापति पदाची आज निवड होत आहे.

छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीमध्ये भाजपाचे सात सदस्य निवडून आले आहेत. सत्तेचे गणित जुळवण्यासाठी व सभापती, उपसभापती पद मिळवण्यासाठी भाजपाच्या उमेदवाराने शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाच्या तीन सदस्यांना आपल्या बाजूने वळवल्याची कुणकुण अंबादास दानवे यांना लागली होती. कालपर्यंत पक्षाचे तालुकाप्रमुख, उपजिल्हाप्रमुखांच्या संपर्कात असलेले हे सदस्य आज मात्र गायब होते.

भाजपाच्या सभापती पदाच्या उमेदवाराने या उमेदवारांना पैशाचे आमिष दाखवून तसेच पोलीस बळाचा वापर करून गायब केल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला. पंचायत समिती आवारात भाजपाचा सभापती पदाचा उमेदवार दिसताच अंबादास दानवे यांनी त्याच्याकडे धाव घेत त्यांची काॅलर पकडली व त्याच्या कानशिलात लगावल्याचा आरोप आहे.

अंबादास दानवे यांनीही याची कबुली दिली, कोणीमध्ये आले नसते तर काय झाले असते? मला सांगता येणार नाही, असे म्हणत त्यांनी आपल्या कृतीचे समर्थनही केले. भाजपा लोकशाही मार्गाने निवडणुकी लढवत नाही. पैसा, सत्तेच्या जोरावर फोडाफोडीचे राजकारण त्यांचे नेते करतात. तुम्हाला सत्तेसाठी मदत पाहिजे असेल तर त्यांनी आमच्याशी चर्चा करायला हवी होती, आम्ही वरिष्ठांची परवानगी घेऊन निर्णय घेतला असता.

पण परस्पर आमच्या उमेदवारांना पैशाचे अमिष दाखवायचे, पोलीस बळाचा वापर करून त्यांना गायब करायचे, हा काय प्रकार आहे? असा सवाल करत अंबादास दानवे यांनी पंचायत समिती कार्यालयाबाहेरच ठिय्या दिला. या गोंधळामुळे येथील वातावरण तापले होते. भाजपाचे कार्यकर्तेही आक्रमक झाले होते. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाते की काय? अशी परिस्थिती होती. परंतु बंदोबस्तावर असलेल्या पोलीसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना दूर करत संघर्ष टाळला.

पंचायत समितीत शिवसेनाच मोठा भाऊ....

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नऊ पंचायत समित्यांच्या 126 जागांसाठी झालेली निवडणुकीत 535 उमेदवार रिंगणात होते. यामध्ये शिवसेनेचे सर्वाधिक 55 सदस्य निवडून आले आहेत. त्या पाठोपाठ भाजपाचे 38, राष्ट्रवादी काँग्रेसचे 12, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 11 सदस्य विजयी झाले आहेत. तर काँग्रेसला तीन, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दोन जागांवर यश मिळाले.

शिवसेनेच्या निवडून आलेल्या पंचायत समिती सदस्यांमध्ये पैठण मधील 17, सिल्लोड व कन्नडमधील प्रत्येकी आठ, वैजापूरमधील सात, छत्रपती संभाजीनगरमधील सहा, गंगापूर पाच, तर सोयगाव व फुलंब्रीतील प्रत्येकी दोन सदस्यांचा समावेश आहे.

भाजपाच्या पंचायत समिती सदस्यांमध्ये सिल्लोडमधील 10 छत्रपती संभाजीनगरमधील सात, गंगापूर सहा, कन्नड चार, सोयगाव फुलंब्री व खुलताबाद प्रत्येकी तीन तर वैजापूरमधील दोन सदस्यांचा समावेश आहे.पैठण तालुक्यात शिवसेनेने 18 पैकी तब्बल 17 पंचायत समिती जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. उर्वरित पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापनेसाठी युती अपरिहार्य ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT