Mumbai News : मुंबईत मंत्रालयासमोर सोमवारी एकाच दिवशी तिघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यापैकी मंगळवारी उपचारावेळी एका महिलेचा मृत्यू झाला तर दुसऱ्या महिलेची प्रकृती गंभीर आहे.यामुळे एकच खळबळ उडाली आहेत. यावरुन विरोधी पक्षाच्या नेतेमंडळींकडून शिंदे सरकारवर सडकून टीका देखील केली जात आहे. आता महिलेच्या मृत्यूनंतर शिंदे सरकारला हादरलं असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांसह प्रशासनाला मोठे आदेश दिले आहेत.
मंत्रालयासमोर सोमवारी मुंबई, धुळे येथील महिलांनी तर पुण्यातील पुरुषाने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यातील धुळ्यातील महिलेचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या महिलेनं विष प्राशन करून मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र, इतर दोघांबाबत पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला आहे. पण या घटनांनी राज्यात एकच खळबळ उडालेली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सामान्य नागरिकांना कोणत्या दिवशी, कोणत्या वेळेत भेटणार हे मंत्रालयातल्या दालनाबाहेर एका बोर्डवर लिहा असे आदेश मंत्र्यांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. याशिवाय विभागीय पातळीवरील अधिकाऱ्यांनी आठवड्यातून किमान दोन दिवस तशी वेळ राखून ठेवावी असे निर्देशही शिंदे यांनी दिले आहेत.
राज्य सरकारच्या परिपत्रकात काय म्हटलंय?
राज्य सरकारच्या सामान्य विभागाकडून मंगळवारी सायंकाळी परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. यात कामाचे स्वरुप लक्षात घेऊन मंत्र्यांनी अभ्यागतांना भेटी देण्यासाठी आठवडा, पंधरवडा, महिना यातले ठराविक दिवस आणि वेळ निश्चित करावी असे या परिपत्रकात म्हटले आहे. तसंच भेटण्याची वेळ आणि दिवस याची माहिती देणारा फलक कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावावा असेही आदेश दिले आहेत.
...म्हणून महिलेनं उचललं टोकाचं पाऊल!
धुळ्यातील मृत महिलेचे नाव शीतल गादेकर होते. मंत्रालयासमोर त्यांनी विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्यांना तत्काळ थांबविले. पण, काही प्रमाणात त्यांनी विषारी द्रव्य प्राशन केले होते. त्यामुळे त्यांना तत्काळ जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान शीतल गादेकर यांचा मृत्यू झाला.
मयत गादेकर या धुळ्यातील आहेत. त्यांच्या पतीच्या निधनानंतर, पतीच्या नावे असणारी जमीन त्यांच्या मित्राने बळकावली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी त्यांची मागणी होती. मात्र याबाबत प्रशासनाला वारंवार माहिती देऊनही दुर्लक्ष होत होतं. त्यातून त्यांनी नैराश्यातून टोकाचं पाऊल उचललं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.