Nagpur News : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.उच्च न्यायालयानं भारतीय जनता पक्षाच्या सुधीर मुनगंटीवारांसह तीन आमदारांना समन्स पाठवले होते. आता त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनाही समन्स बजावलं आहे.
गेल्या वर्षी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून मिळालेल्या विजयाला आव्हान देण्यात आलं होतं. याच याचिकवरुन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर (Nagpur) खंडपीठानं गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
काँग्रेसचे प्रफुल्ल विनोदराव गुडथे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध ही याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे प्रफुल्ल विनोदराव गुडथे यांचा फडणवीस यांच्याकडून 39,710 मतांच्या फरकाने पराभव झाला होता.या पराभवानंतर गुडधे यांनी प्रक्रियात्मक त्रुटी आणि भ्रष्ट पद्धतींचा आरोप केला आहे आणि उच्च न्यायालयाने फडणवीस यांचा विजय "अवैध" घोषित करावा अशी मागणी केली आहे.
आता न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांच्या नागपूर खंडपीठाने मुख्यमंत्री फडणवीस यांना नोटीस बजावली आहे. या नोटिशीला उत्तर देण्यासाठी फडणवीसांना 8 मेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे,अशी माहिती काँग्रेसचे प्रफुल्ल गुडथे यांचे वकील पवन दहत यांनी पीटीआयला दिली आहे.
गुडधे यांचे वकील दहत आणि एबी मून यांनी गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघात अनेक अनिवार्य तरतुदींचे पालन करण्यात आले नाही,असा दावा केला आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीने 288 सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेत २३० जागा जिंकल्या, त्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री झाले.दरम्यान, उच्च न्यायालयाने नागपूर पश्चिमेतील भाजप आमदार मोहन मते आणि चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर मतदारसंघातील कीर्तीकुमार भांगडिया यांनाही अशाच प्रकारच्या निवडणूक याचिकांवर नोटीस बजावली होती.
याआधी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या तीन आमदारांना समन्स पाठवण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तिकिटावर सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे राजेंद्र शिंगणे यांनी निवडणूक याचिका दाखल केली होती. ज्यामध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रक्रियेतील गैरप्रकारांवर प्रकाश टाकण्यात आला होता, तर इतर याचिका राजुरा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार सुभाष धोटे आणि बल्लारपूर येथील काँग्रेस उमेदवार संतोष सिंग रावत यांनी दाखल केल्या होत्या.
तसेच उच्च न्यायालयाने बुधवारी झालेल्या सुनावणीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार मनोज कायंदे, भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार आणि देवराव भोगाडे यांना समन्स बजावले आहे. तसेच त्यांना 3 आठवड्यांच्या आत लेखी उत्तर देण्याचे आदेशही दिले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.