Maharashtra CMO issues notice to CIDCO: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यावरून राज्याच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला आहे.
या सोहळ्यासाठी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांना निमंत्रित करण्यात आले नसल्याने महायुतीत नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाची मुख्यमंत्री कार्यालयाने (CMO) गंभीर दखल घेत सिडको प्रशासन आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण (NNIAL) यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत 6 जून रोजी नवी मुंबई (Navi Mumbai) आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ हा भव्य कांस्य अर्धपुतळा उभारण्यात आला. 20 फूट उंच संरचनेवर बसविण्यात आलेला 12 फूट उंचीचा हा पुतळा नवी मुंबईतील प्रसिद्ध शिल्पकार नितीन गोर्डे यांनी राज्य शासनाच्या कला संचालनालयाच्या मंजुरीने साकारला आहे.
या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत केवळ मुख्यमंत्री फडणवीस यांचेच नाव छापण्यात आले होते. राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांची नावे नसल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात आले. या पार्श्वभूमीवर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमास अनुपस्थित राहणे पसंत केल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेनंतर महायुतीतील घटक पक्षांमध्ये नाराजीची चर्चा रंगली असून, राजशिष्टाचार नियमांचे उल्लंघन झाल्याचा मुद्दा पुढे आला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने तातडीने हस्तक्षेप करत कार्यक्रमाचे नियोजन करताना शासकीय प्रोटोकॉलचे पालन का झाले नाही, तसेच उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण का देण्यात आले नाही, याबाबत लेखी स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू असल्यामुळे या कार्यक्रमाचे आयोजन सिडकोने केले नसल्याचे स्पष्टीकरण संबंधित सूत्रांकडून देण्यात आले आहे. त्यामुळे नोटीसबाबत आमचा संबंध नसल्याचा दावा सिडकोकडून करण्यात येत आहे. दुसरीकडे, एनएनआयएल प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.
या संपूर्ण वादाला आणखी महत्त्व प्राप्त होण्याचे कारण म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खात्याची जबाबदारी आहे. सिडको हे महामंडळ थेट नगरविकास विभागाच्या अखत्यारीत कार्यरत असताना, राज्यातील सर्वात महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांपैकी एका प्रकल्पातील मोठ्या शासकीय कार्यक्रमाची माहितीच संबंधित मंत्र्यांना नसणे आणि त्यांना निमंत्रित न करणे, हा गंभीर प्रशासकीय समन्वयाच्या अभावाचा प्रकार मानला जात आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पात सिडको ही राज्य सरकारची प्रमुख भागीदार संस्था असून, विमानतळाचे संचालन अदाणी समूहाच्या एनएनआयएलमार्फत केले जाते. त्यामुळे आता या प्रकरणात नेमकी चूक कुणाची, याकडे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.