

West Bengal Political Crisis : पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून, ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये पक्षाच्या स्थापनेनंतरची सर्वात मोठी फूट पडल्याचे चित्र आहे.
आधी लोकसभेतील 20 खासदारांनी स्वतंत्र गटाची भूमिका घेतल्यानंतर आता 58 आमदारांनीही बंडाचा झेंडा उभारला आहे. या बंडखोर आमदारांनी पक्ष नेतृत्वाच्या भूमिकेला छेद देत ऋतव्रत बॅनर्जी यांना विरोधी पक्षनेतेपदासाठी पाठिंबा दिला आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेसमधील (TMC) नाराजी उघडपणे समोर येऊ लागली होती. मात्र गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांनी पक्षातील अंतर्गत संघर्ष थेट फुटीपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे. बंडखोर आमदारांनी दोन-तृतीयांश संख्याबळाचा दावा करत विधानसभेतील पक्षाच्या विधिमंडळ गटावरच दावा ठोकला आहे.
58 आमदारांच्या पाठिंब्यावर ऋतव्रत बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली असून, विधानसभा अध्यक्षांनी त्यांना मान्यताही दिली आहे. मात्र या निर्णयाला ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) गटाने तीव्र विरोध दर्शवत कलकत्ता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला डावलून घेतलेला हा निर्णय घटनाबाह्य असल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणाची सुनावणी 11 जून रोजी होणार असून, 18 जूनपासून सुरू होणाऱ्या विधानसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या खटल्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
निवडणुकीतील पराभवानंतर पक्ष संघटनेवरील आपली पकड कायम असल्याचा संदेश देण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी बैठका घेतल्या होत्या. मात्र या बैठकींना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. अनेक आमदार आणि खासदार गैरहजर राहिल्याने पक्षातील नाराजी किती खोलवर गेली आहे, याची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर आता आमदार आणि खासदार दोन्ही पातळ्यांवर झालेल्या बंडामुळे ममतांच्या नेतृत्वासमोरील आव्हान आणखी तीव्र झाले आहे.
ममता बॅनर्जी दिल्लीत ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत सहभागी असताना, दुसरीकडे नाराज खासदारांनी स्वतंत्र बैठक घेतली. पक्षाच्या मुख्य प्रतोद काकोली घोष दस्तीदार यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 20 खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र देत स्वतंत्र गटाच्या दाव्यावर शिक्कामोर्तब केले. या खासदारांनी भाजपप्रणीत NDA ला पाठिंबा देण्याची तयारीही दर्शविल्याची माहिती समोर आली आहे.
यासाठी या खासदारांनी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि पश्चिम बंगालमधील भाजपचे प्रमुख नेते सुवेंदू अधिकारी यांची भेट घेतल्याचेही वृत्त आहे. पक्षातील निर्णयप्रक्रिया, नेतृत्वशैली आणि पराभवानंतरच्या राजकीय दिशेबाबत नाराजी असल्याचे या खासदारांचे म्हणणे आहे.
तृणमूल काँग्रेसच्या 28 वर्षांच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर आमदार आणि खासदारांनी एकाच वेळी बंड केल्याचे पाहायला मिळत आहे. 58 आमदार आणि 20 खासदारांच्या हालचालींमुळे पक्षाच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठ्या पुनर्रचनेची शक्यता व्यक्त केली जात आहे. ममता बॅनर्जी यांच्यासाठी हे आतापर्यंतचे सर्वात मोठे राजकीय आव्हान मानले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.