Ashok Chavan Join Bjp Sarkarnama
महाराष्ट्र

Ashok Chavan : अशोक चव्हाणांनी सोडला काँग्रेसचा 'हात', आजच देणार भाजपला 'साथ'?

Akshay Sabale

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण ( Ashok Chavan ) यांनी सोमवारी पक्षाचे सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिला. येत्या दोन दिवसांत आपली पुढील भूमिका स्पष्ट करू, असं चव्हाणांनी जाहीर केलं आहे. पण, अशोक चव्हाण आजच मंगळवारी ( 13 फेब्रुवारी ) भाजपत प्रवेश करण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजप कार्यालयात हा पक्ष प्रवेश होणार असल्याचं सांगितलं जातं आहे.

मिलिंद देवरा, बाबा सिद्दिकींपाठोपाठ अशोक चव्हाण बाहेर पडल्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीतील उभ्या फुटीनंतर महाविकास आघाडीतील तिसऱ्या पक्षालाही गळती लागल्याचं स्पष्ट झालं आहे. चव्हाणांबरोबर आणखी काही नेते भाजपच्या वाटेवर असल्याचं सांगितलं जात आहे.

लोकसभा जिंकण्याच्या उद्देशानं प्रत्येक मतदारसंघात यश मिळवण्यासाठी अन्य पक्षातील कोणत्या नेत्यांचा उपयोग होईल, यादृष्टीनं भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत. अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण यांनी आयुष्यभर काँग्रेससाठी काम केलं. ते गांधी घराण्याशी एकनिष्ठ होते. अशोक चव्हाण भाजपत गेल्यास त्यांचे अनेक समर्थक काँग्रेसमधून फुटण्याची शक्यता आहे. अशोक चव्हाण यांना भाजपत मोठ्या पदाचं आश्वासन दिल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, गृहमंत्री अमित शाह 15 फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. गृहमंत्री शाहांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात येत होतं. पण, आजच अशोक चव्हाण भाजपत प्रवेश करण्याची शक्यता आहे.

अशोक चव्हाण काय म्हणाले?

"मी काँग्रेसमध्ये प्रामाणिकपणे काम केलं. भाजपत जाण्याबाबत अद्याप निर्णय घेतला नाही. पक्षानं मला खूप काही दिलं मान्य... पण मीही पक्षासाठी खूप काही केलं आहे. आपण कोणत्याही आमदाराच्या संपर्कात नाही. पण, इतर काय निर्णय घेतात, हे मला सांगता येत नाही," अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाणांनी राजीनामान्यानंतर दिली.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT