महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 'गुंगी गुडिया' या वक्तव्यावरून सुरू असलेल्या वादाला नवं वळण मिळालं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत खेद व्यक्त केला आहे. आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचा दावा त्यांनी केला असून, आपला उद्देश वैयक्तिक टीका करण्याचा नव्हता, असं सपकाळ यांनी स्पष्ट केलं आहे.
सुनेत्रा पवार यांच्याबाबत 'गुंगी गुडिया' हा शब्दप्रयोग केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून काँग्रेसवर जोरदार टीका करण्यात आली होती. या वक्तव्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं होतं. राष्ट्रवादीच्या आक्रमक भूमिकेनंतर आता काँग्रेसकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांनी या संपूर्ण प्रकरणाची पार्श्वभूमी स्पष्ट करताना सांगितलं की, 'गुंगी गुडिया' हा शब्दप्रयोग यापूर्वी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या संदर्भात वापरण्यात आला होता. ज्येष्ठ समाजवादी नेते राम मनोहर लोहिया यांनी इंदिरा गांधींसाठी हा शब्दप्रयोग केल्याचा दाखला सपकाळ यांनी दिला. मात्र, पुढे इंदिरा गांधी यांनी घेतलेल्या कणखर निर्णयांमुळे त्यांना 'दुर्गा' असंही संबोधलं गेलं, असं त्यांनी नमूद केलं.
राजकीय टीकेमध्ये वेगवेगळ्या नेत्यांसाठी रूपकं आणि विशेषणांचा वापर यापूर्वीही झाल्याचं सपकाळ यांनी सांगितलं. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर 'मौनी बाबा' अशी टीका करण्यात आली होती, तर राहुल गांधी यांच्यावरही विविध प्रकारची टीका केली जाते, असं त्यांनी स्पष्ट केलं.
या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, 'आपल्या सांगण्याचा हेतू वेगळा होता आणि लोकांपर्यंत त्याचा अर्थ वेगळा पोहोचला. या संवादातील गैरसमजामुळे आणि चुकीच्या अर्थामुळे हा सर्व गोंधळ निर्माण झाला आहे. संदेश स्पष्टपणे पोहोचू शकला नाही आणि त्याचा मिसकम्युनिकेशन झाले, याबद्दल आपण खेद व्यक्त करतो.'
दरम्यान, 'गुंगी गुडिया' वक्तव्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेला वाद आता कोणतं वळण घेतो, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्या स्पष्टीकरणानंतर काँग्रेसने या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.