Nana Patole Sarkarnama
महाराष्ट्र

Nana Patole : नाना पटोलेंची मोठी मागणी; राज्य सरकार काय निर्णय घेणार

Nana Patole demand for outright loan waiver of farmers : राज्य सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. परंतु राज्यातील महायुती सरकार केवळ लाडका बिल्डर, लाडका उद्योगपतींसाठी काम करताना दिसते आहे.

Pradeep Pendhare

Mumbai News : राज्यातील महायुती सरकार केवळ लाडका बिल्डर, लाडका उद्योगपती यांच्यासाठीच काम करत आहे. शेतकऱ्यांसाठी कधी वेळ काढणार हे त्यांनाच माहिती. राज्यातील बळीराजा संकटात असून, महायुती सरकारने त्याचा विचार करावा.

तेलंगणातील काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली असून, त्यापद्धतीने राज्यात संकटात सापडलेल्या बळीराजाला सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मोठी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील सत्ताधारी विशेष अधिवेशन घेण्याच्या तयारीत दिसते. यात शेतकऱ्यांना कर्जमाफी, मराठा आरक्षण आणि विधान परिषद सभापती निवडीचा विषय घेण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा विषय काँग्रेसने लावून धरण्यास सुरवात केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावरून राज्यातील महायुती सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. सत्ताधाऱ्यांना राज्यातील बळीराजाकडे संपूर्ण दुर्लक्ष केले आहे. तसेच केंद्रातील भाजप (BJP) सरकारने अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राला जेवढे झुकते माप देण्याची गरज होती, तेवढं दिलं नसल्याचा दावा नाना पटोले यांनी केला. राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांची कठीण परिस्थिती लक्षात घेऊन सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी केली.

नाना पटोले म्हणाले, राज्यात यावर्षी वातावरणातील बदलाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. काही भागात दुष्काळ, तर काही भागात ओला दुष्काळ अशी परिस्थितीचा सामना शेतकऱ्याला करावा लागला आहे. आता पावसाळ्यात देखील काही भागात अतिवृष्टी झाली आहे. काही भागात अजून पावसाची प्रतिक्षा आहे. काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट आहे. बोगस खते बि-बियाणांचे सुळसुळाट सुरूच आहे. पण सरकार शेतकऱ्यांना पोळक आश्वासनांशिवाय काहीच देत नाही. पीक विम्याच्या लोकप्रिय घोषणा केल्या. परंतु त्याचा फायदा शेतकऱ्यांना (Farmer) झालेला नाही. पीक विमा कंपन्यांना मात्र गडगंज फायदा झाला. यातच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. गेल्या सहा महिन्यात 1 हजार 727 शेतकऱ्यांच्या आत्महत्या केल्या आहेत, हे महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. अशा काळात शेतकऱ्यांच्या पाठिशी उभी राहून सरकारने त्यांना दिलासा देण्यासाठी सरसकट कर्जमाफी केली पाहिजे, अशी मागणी नाना पटोले यांनी केली.

लाडक्या घोषणांबरोबर शेतकऱ्यांकडे बघा

महायुती सरकार सध्या लाडक्या घोषणेत बिझी आहे. लाडका बिल्डर, लाडका उद्योगपती यांच्यासाठी महायुती सरकार काम करत आहे. उद्योगपती अनिल अंबानी यांचे 1700 कोटी रुपये माफ केले. यासाठी सरकारला कोठून पैसे आले. मोठ्या उद्योगपतींचे 16 लाख कोटी रुपयांचे कर्ज भाजप सरकारने माफे केले. पण शेतकऱ्यांना देण्यासाठी भाजप सरकारकडे पैसे नाही. हा दुजाभाव का? असा सवाल नाना पटोले यांनी केला.

राज्यपालांकडे कर्जमाफीची मागणी

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने 11 जूनला राज्यपाल यांची भेट घेतली. या भेटीत राज्यातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीकडे लक्ष वेधण्यात आले. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेस पक्षाने राज्य सरकारकडे यासंदर्भात मागणी केली होती. पण महाभ्रष्टयुती सरकारने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल, अशी अपेक्षा होती. पण केंद्र सरकारने देखील शेतकऱ्यांची निशाराच केली. महाविकास आघाडी सरकार येताच शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेणार असल्याचे नाना पटोले यांनी जाहीर केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT