Congress News : महाराष्ट्रात काँग्रेसअंतर्गत कलह काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाही. त्यात दररोज नवनवीन घटनांची भर पडून तो चिघळत चालल्याचे दिसून येत आहे. विधानपरिषदेतील नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमदवारीवरून सुरू झालेला वाद विधीमंडळ पक्षनेत्याच्या राजीनाम्यापर्यंत गेला. या सर्व घडामोडींमुळे काँग्रेसअंतर्गत सुरू असलेला वाद चव्हाट्यावर आला.
सध्या महाराष्ट्रात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यातील वाद शिगेला पोहचला आहे. नाशिक पदवीधर मतदाससंघात उमेदवारी देण्यावरून राजकारण केल्याचा आरोप आमदार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी केला. तांबे कुटुंबास काँग्रेसबाहेर ढकलण्याचे प्रयत्न झाले. बाळासाहेब थोरात यांना आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवले, असे काही आरोप सत्यजीत तांबे यांनी केले.
त्यास माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दुजोरा दिला. यासह प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्याबरोबर काम करणे कठीण होत आहे, असे सांगितले. तसेच थोरात यांनी विधीपक्षनेते पदाचा राजीनामा दिला. ते राजीनाम्यावर ठाम आहेत. त्यामुळे हा वाद वाढल्याचे बोलले जात आहे.
या पार्श्वभूमीवर रविवारी (ता. १२) महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील मुंबईत येणार आहेत. तेथे ते बाळासाहेब थोरात त्यांची भेट घेणार आहेत. त्यांच्यात राजीनाम्याबाबत चर्चा होईल. त्यानंतर काही तोडगा निघतोय का, त्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
थोरात यांनी आपल्या विधीपक्षनेता पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान काँग्रेसच्या काही नेत्यांनी त्यांना राजीनामा माघारी घेण्याची विनंती केली. मात्र सध्यातरी थोरात राजीनाम्यावर ठाम आहेत. त्याच अनुषंगाने थोरात-पाटील यांची भेट महत्वाची ठरणार आहे. आता या भेटीनंतर थोरात काय निर्णय घेतील, याकडे लक्ष लागले आहे. राजीनामा मागे घेतला तर काँग्रेसमध्ये सध्या आहे तशीच स्थिती राहिल; अन्यथा मोठे बदल होतील, अशी चर्चा सुरू आहे.
दरम्यान राज्यात सध्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली जात आहे. विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांनी पटोले यांच्या विरोधात मोहीम उघडली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Pruthviraj Chavan) यांनी राज्यात लवकरच संघटनात्मक बदल होणार असल्याचे संकेत दिले आहे.
या वादात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी पटोले यांची बाजू लावून धरली आहे. लोंढे यांनी सांगितले की, नाना पटोले यांनी तडकाफडकी वा घिसाडघाईने कोणताही निर्णय घेतलेला नाही. तर तो काँग्रेसच्या तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सूचनेनुसार घेतल्याचे सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.