Sangli News: राज्यात सध्या दहिहंडी आणि गणेशोत्सवातील डीजे,डॉल्बी आणि हाय-पॉवर साऊंड सिस्टीमच्या वाजवण्यावरुन राजकीय,सामाजिक आणि कायदेशीर वादावा तोंड फुटले आहे. तसेच दहिहंडी उत्सवात महिलांचे बीभत्स नृत्यावरुन आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहे. विद्यानंद बापट यांनी पुण्यातून डीजे विरोधाचा मुद्दा पेटवला असून त्याला आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनीही पाठिंबा दर्शवला आहे. आता डीजेच्या या वादात आता शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरूजी यांची पहिल्यांदाच पण तितकीच कठोर भूमिका समोर आली आहे.
एकीकडे सोशल मीडियावर दहीहंडी कार्यक्रमांमधील महिला कलाकारांचे काही अश्लील हावभाव आणि नृत्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. यामुळे राजकीय नेतेमंडळी, सामाजिक कार्यकर्ते, सामान्य नागरिकां आक्रमक भूमिका घेताना आयोजकांचे चांगलेच कान टोचले आहेत.
आता याचदरम्यान,आपल्या रोखठोक आणि आक्रमक भूमिकांसाठी ओळखले जाणारे शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी गणेशोत्सवातील डॉल्बी-डीजेचा वापरावर त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच काही ठिकाणी दहीहंडी उत्सवात गौतमी पाटील, राधा पाटील, ऐश्वर्या जाधव यांसारख्या नृत्यांगना आणि काही अभिनेत्रींच्या नाचण्यावरून उद्भवलेल्या वादावरही रोखठोक भाष्य केलं आहे.
संभाजी भिडे यांनी देशातील संबंध जनतेने आपल्या सर्व सण-उत्सवांमधून डॉल्बी आणि डीजे फेकून दिले पाहिजेत असं मोठं विधान केलं आहे. हिंदूंच्या सर्व सण-उत्सवांमध्ये डॉल्बीची काहीच गरज नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. डीजे-डॉल्बीचा नेमका उपयोग काय? आपल्या देशाला त्याच्या वाजवण्यानं काय बळ मिळते? डीजे आणि डॉल्बीमुळे फक्त मूर्खपणा वाढत असल्याचंही भिडे गुरुजी यांनी सांगितलं.
त्यांनी समाजातील सर्व काळ्या शक्तींना गाडण्यासाठी काही गोष्टींना नाकारले पाहिजे,ज्यात डॉल्बीचा समावेश असल्याचं नमूद केलं. दहीहंडी आपली संस्कृती आणि धर्म असून या कार्यक्रमांमध्ये महिलांना नाचवले जाणे हे योग्य नसल्याचं मत व्यक्त केलं आहे.
दहिहंडीच्या कार्यक्रमात महिलांना नाचवणं हा मूर्खपणा असून असे प्रकार करणारे देशद्रोही असल्याचं खळबळजनक विधानही भिडे यांनी केलं आहे. ते म्हणाले,जरी ते दहिहंडी कार्यक्रमाचं आयोजन करणारे आपले असले तरी ते मूर्ख आहेत,त्यांना समजत नाही अशा शब्दांत भिडे यांनी फटकारलं आहे.
पुण्यातील विद्यानंद बापट यांनी शहरातील ध्वनीप्रदूषणाविरोधात कठोर भूमिका घेतानाच गणेशोत्सवातील कर्णकर्कश आवाजाचा मुद्दा तापवला आहे. त्यांनी थेट गणेश मंडळं, डीजे,डॉल्बी व्यावसायिक यांनाच आव्हान दिलं. धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्यावर एका वृत्तवाहिनीशी बोलताना हल्लाही करण्यात आला. यामुळे डीजेच्या मुद्द्याला राज्यव्यापी राजकीय आणि सामाजिक स्वरूप मिळाले. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असून हल्ल्याच्या घटनेमुळे वाद आणखी तीव्र झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.