Devendra Fadnavis News Sarkarnama
महाराष्ट्र

Maratha Reservation : देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान; '...त्यांना कुणबी आरक्षण देता येणार नाही'

Sachin Waghmare

Marathi News : गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू होते. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Ekanath shinde) मार्ग काढला आहे. कार्यपद्धती सोपी करीत त्यांनी ओबीसी समाजावर कसलाच अन्याय होणार नाही, अशा प्रकारे मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली मागणी सोडवत त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिल्याने अनेक प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

यावेळी फडणवीस यांना मंत्री छगन भुजबळ यांच्या नाराजीबाबत प्रश्न विचारला असता त्यावर फडणवीसांनी महत्त्वाचं वक्तव्य केले. ज्यांच्या नोंदी सापडलेल्या नाहीत त्यांना आरक्षण देण्याबाबतचा निर्णय झालेला नाही, त्यामुळे ओबीसी समाजावर कोणताही अन्याय झालेला नाही, असे फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.

मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांचे त्यांनी कौतुक केले. यावेळी त्यांनी संविधानचा मान ठेवून आरक्षणाची मुद्देसूद मागणी केली होती. त्यामुळे हा आरक्षणाचा प्रश्न सोडवताना सरकारला अडचण आली नसल्याचे त्यांनी सांगितले.

मी मंत्री छगन भुजबळ यांना अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो की, कुठल्याहीप्रकारे ओबीसींवर अन्याय होईल, असा कुठलाही निर्णय राज्य सरकारने घेतलेला नाही. किंबहुना नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र मिळायला ज्या अडचणी येत होत्या, त्या अडचणी आपण दूर केल्या आहेत.

मराठा समाजातील ज्यांच्या कुणबी नोंदी नाहीत, त्यांना आरक्षण मिळावे, यासाठी सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करण्यात आली आहे. त्या माध्यमातूनही सरकार मराठा समाजाला मागासवर्गीय आयोगाच्या शिफारशी आणि अहवालानुसार आरक्षण देण्यासाठी कायदेशीर लढाई लढेल आणि आरक्षण देईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पोलिसांना मारहाण केल्याचा गुन्हा मागे घेतला नाही

मराठा समाजाच्या आंदोलनकाळातील इतर किरकोळ गुन्हे मागे घेण्याचा आदेश दिला आहे. मात्र, घर जाळणे, पोलिसांवर हल्ला करणे, बस जाळणे हे गुन्हे कोर्टाच्या आदेशाशिवाय मागे घेता येत नाहीत. त्यामुळे येत्या काळात त्यासाठी कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहावी लागणार आहे. त्याशिवाय पोलिसांना मारहाण केल्याचे गुन्हे मागे घेतले नसल्याचे त्यांनी यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सांगितले.

(Edited By : Sachin Waghmare)

R...

SCROLL FOR NEXT