PM Modi-Raosaheb Danve Sarkarnama
महाराष्ट्र

BJP Leader Raosaheb Danve News : मोदी म्हणाले, रावसाहेब दानवेजी का काम रुकना नही चाहिए ; अन् झाले हे मोठे काम

Tushar Patil

Maharashtra Railway News : राजकारणात निष्ठा, विकासकामाचा ध्यास, सातत्य आणि वरिष्ठ नेत्यांशी समन्वय, संपर्क महत्वाचा असतो. याबाबतीत माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री तथा भाजपचे महाराष्ट्रातील नेते रावसाहेब दानवे सरस ठरतात. राज्य, केंद्र आणि पक्ष संघटना अशा तीनही पातळीवर दानवे यांनी आपली चमक दाखवली आणि आपले स्वतंत्र स्थान राज्याच्या, दिल्लीच्या राजकारणात निर्माण केले आहे. त्यामुळे निवडणुकीत झालेल्या एका पराभवाने त्यांच्या या ओळख आणि राजकीय वजनात काही फरक पडलेला नाही.

याचे ताजे उदाहरण म्हणजे जालना-जळगाव या महत्वाकांक्षी प्रकल्पाला मिळालेली मंजुरी. केंद्रात रेल्वे राज्यमंत्री असतांना दानवे (Raosaheb Danve) यांनी या प्रकल्पाची संकल्पना आणि त्याला वेग देण्याचे काम केले होते. परंतु प्रकल्पाच्या निधीला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी मिळाल्याशिवाय या कामाला मुर्त रुप प्राप्त होत नाही. लोकसभा निवडणुकीत सलग सहावा विजय मिळाला असता तर कदाचित रावसाहेब दानवे केंद्रात कॅबिनेट मंत्री झाले असते आणि या रेल्वे मार्गाला मंजुरी, निधी मिळवणे अधिक सोपे झाले असते.

पण दुर्दैवाने लोकसभेच्या जालना मतदारसंघातून दानवे यांच्या पराभव झाला आणि पक्षाने त्यांच्यावर संघटनेची मोठी जबाबदारी दिली. पण खासदारकी, मंत्रीपद नसले तरी दिल्लीत अजूनही दानवेंचा आवाज चालतो हे सिद्ध करणारी घटना नुकतीच घडली. रावसाहेब दानवे यांच्या जालना लोकसभा मतदारसंघातून जाणाऱ्या जालना-जळगाव रेल्वे मार्ग आणि त्यासाठी लागणाऱ्या निधीला नुकतीच केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली. रावसाहेब दानवे यांच्या राजकीय प्रवासातील हा महत्वपुर्ण टप्पा ठरला.

या रेल्वे मार्गाला कॅबिनेटची मंजुरी कशी मिळाली? याचा रंजक किस्सा रावसाहेब दानवे यांनी नुकताच `सरकारनामा` शी बोलतांना सांगितला. (Narendra Modi) रेल्वे राज्यमंत्री असताना दानवे यांनी महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील वर्षानुवर्षे रखडलेल्या अनेक कामाना वेग देत त्यांना रुळावर आणण्याचे काम केले. त्यात रेल्वे मार्गांचे दुहेरीकरण, जालना, छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाच्या नूतन इमारतीचे काम,नांदेडपर्यंतचे विद्युतीकरण व वंदे भारत ट्रेन याचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर केंद्रातील मोदी सरकारने जालना-जळगाव रेल्वे मार्गाला मंजुरी देत रावसाहेब दानवे यांना खास गिफ्ट देत त्यांच्या विकासकामा प्रती असलेल्या भावनेचा योग्य सन्मान राखला. भाजपचे ज्येष्ठ नते माजी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी नुकतीच राजस्थानच्या राज्यपाल पदावर नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या शपथविधी सोहळ्याला रावसाहेब दानवे उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी थेट दिल्ली गाठली आणि प्रधानमंत्री कार्यालयाला कळवून नरेंद्र मोदी यांची भेट मागितली.

आप सत्ता मे नही तो क्या हुआ..

दुपारी 11. 40 ला भेट निश्चित झाली आणि रावसाहेब दानवे नरेंद्र मोदी यांना भेटले. `क्या चल रहा है रावसाहेबजी`, असे विचारत त्यांनी मतदारसंघातील परिस्थिती काय आहे ? याची माहिती करुन घेतली. मोदी यांच्या प्रश्नाचा रोख लक्षात आल्याने दानवे यांनी स्मित हास्य करत उत्तर दिले. मतदारसंघ, राजकीय समीकरणे, पराभवाची कारणे यावर थोडक्यात चर्चा झाल्यानंतर दानवे यांनी मुळ मुद्द्याला हात घातला. दानवे म्हणाले, मोदीजी मै फिलहाल मंत्री नही हु, लेकिन मेरा एक काम आपके तरफ अटका है.

त्यावर मोदींनी विचारले क्या काम. तेव्हा जालना- जलगाव इस रेल रूट को मान्यता दी गई है. इसका सर्वे भी हो चुका है, हालही मे राज्य सरकारने इस प्रोजेक्ट के लिये फंड भी जुटाया है. बाकी सब फॉर्मेलिटीस हो चुकी है, ये प्रोजेक्ट स्टील इंडस्ट्री फॉर मराठवाडा के विकास के लिये बहुत ही महत्वपूर्ण है. इस कॅबिनेट मे आप इसे मंजुरी दे ये इच्छा है. यावर मोदींनी पुन्हा हसत `आप सत्ता मे नही हुए तो क्या हुआ, आपके क्षेत्र का काम रुकना नही चाहिये. आपका काम हो जायेगा, असा शब्द दिला.

त्यानंतर झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाने दोनच दिवसात जालना- जळगाव रेल्वे प्रकल्पासाठीच्या 7105 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली. हा प्रकल्प पूर्ण होण्याच्या दृष्टीने भूसंपादन, अजिंठा घाटातील बोगदा अशा सगळ्याच गोष्टी आता मार्गी लागल्या आहेत. रावसाहेब दानवे जरी आज खासदार आणि मंत्री नसले तरी त्यांचे मोदी आणि अमित शहा यांच्यांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत. महाराष्ट्रातील अनेक रेल्वे मार्ग ब्रिटिश काळापासून रखडलेले आहेत.

बीड- परळी हा रेल्वे मार्ग अजूनही पूर्ण झालेला नाही. मात्र दानवे यांच्या दोन वर्षाच्या कार्यकाळात जालना- जळगाव हा नवीन रेल्वे मार्ग मंजूर होऊन त्याला निधीही आला. राज्य सरकारकडून मंजुरी व निधी या सर्वच गोष्टी पूर्ण करून दानवे यांनी आपले केंद्रातील राजकीय वजन सिद्ध केले. याची वाच्यता मात्र कुठेही केलेली नाही अर्थात भाजपच्या शिस्तबद्ध शैलीप्रमाणे दानवेंना याचे फलित आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विधानसभा संयोजक पदी नियुक्तीच्या रुपात मिळाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT