Mahayuti Government Guinness World Record  Sarkarnama
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : महायुती सरकारच्या 'त्या' विक्रमाची गिनीज बुकात नोंद; देवाभाऊंच्या कौतुक सोहळ्यात शिंदे-पवारांची भासली उणीव!

Mahayuti Government Guinness World Record : महा्युती सरकारच्या उल्लेखनीय विक्रमाची गिनीज बुकात नोंद करण्यात आली. देवेंद्र फडणवीसांच्या कौतुक सोहळ्यात एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या अनुपस्थितीची चर्चा रंगली.

Jagdish Pansare

Mahayuti News : राज्यातील महायुती सरकारमध्ये 'दरार' पडल्याचे आणि ती दिवसेंदिवस वाढत चालल्याचे वांरवार स्पष्ट होऊ लागले आहे. विशेषतः देवाभाऊंची भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील फोडाफोडीने थेट युतीच्या भवितव्यावरच प्रश्न चिन्ह निर्माण केले आहे. शिवसेना-भाजप युतीमधील हा तणाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या छत्रपती संभाजीनगरमधील एका विशेष कौतुक सोहळ्यात स्पष्टपणे दिसून आला.


महायुती सरकारच्या 'मागेल त्याला सौर कृषीपंप' योजनेच्या माध्यमातून एक आगळ्या वेगळ्या विक्रमाची नोंद झाली आहे. त्याबद्दल आज छत्रपती संभाजीनगरच्या आॅरिक सिटीमध्ये एका दिमाखदार सोहळ्याचे आयोजन आणि त्यातून मुख्यमंत्र्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. सरकारच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांनी गिनीज बुककडून प्रमाणपत्र स्वीकारले. एरवी सरकारच्या कुठल्याही यशाचे श्रेय घेण्यासाठी धडपडणारे मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते दोन्ही उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाचे आमदार, खासदारही या कौतुक सोहळ्याकडे फिरकले नाहीत. त्यामुळे हा कार्यक्रम महायुतीचा न राहता भाजपचाच वाटला.

जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे निमंत्रण पत्रिकेत नाव असूनही ते मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित असलेल्या या कार्यक्रमाला गैरहजर राहिले. मराठवाड्यातील महायुतीचे एकमेव खासदार संदीपान भुमरे हे देखील आले नाहीत. संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे दिल्लीत असल्याचे सांगितले जाते. एकूणच महायुती सरकारच्या एका योजनेचे कौतुक होवून त्याची नोंद गिनीज बुकमध्ये होते आणि त्याच्याच कौतुक सोहळ्यात व्यासपीठावर फक्त शतप्रतिशत भाजपाच असल्याचे चित्र पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मात्र यापेक्षा शेतकरी मोठ्या प्रमाणात सौर कृषीपंपाकडे वळत असल्याचा आनंदच अधिक झाल्याचे त्यांच्या देहबोलीवरून दिसून आले.

सौर उर्जेमुळे वीज होणार स्वस्त : फडणवीस

देशात महाराष्ट्र हे सौर ऊर्जेचा शेतीत सर्वाधिक वापर करणारे राज्य ठरले आहे. शेतकऱ्यांसाठी फिडर सौर ऊर्जेवर आणून स्वतंत्र 16 हजार मेगा वाट वीज निर्मिती करु. त्यामुळे अन्य वापरातील विजेच्या दरात आपण दरवर्षी 3 टक्के कपात करुन ग्राहकांना स्वस्त वीज देऊ शकतो, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना दिला. एका महिन्यात 45 हजार 911 कृषी पंप 'मागेल त्याला सौर कृषीपंप'योजनेत देऊन महाराष्ट्राने विश्वविक्रम केला आहे.

गिनीज बुकतर्फे विश्वविक्रम प्रमाणपत्र प्रदान सोहळा आज छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा एमआयडीसीमध्ये ऑरिक सिटी मैदानावर पार पडला. या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. या विश्वविक्रमाची घोषणा करण्यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सचे कार्ल सॅबेले हे ही यावेळी उपस्थित होते. या सोहळ्याला राज्याचे बहुजन कल्याण व अपारंपारिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, आमदार संजय केणेकर, अनुराधा चव्हाण, नारायण कुचे, प्रशांत बंब, सुरेश धस याची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात सुरुवातीला शासनाच्या वर्षपूर्तीनिमित्त राज्यातील जनतेचे आभार व्यक्त केले. हे जनतेला समर्पित वर्ष होते. सगळ्यांच्या जीवनात मूलभूत परिवर्तनसाठी योजना आणल्या त्या कार्यान्वित केल्या. महाराष्ट्र थांबणार नाही, असाच पुढे जात राहील, हा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रखर दुष्काळाचा सामना करतांना नेहमीच पाण्याची आणि विजेची अडचण होती. जलयुक्त शिवार योजनेमुळे पाण्याची उपलब्धता करतांना विजेच्या समस्येमुळे शेतकऱ्यांना सिंचन करण्यात अडचण होती. दिवसा वीज मिळावी ही प्रमुख मागणी होती.

रात्री अपरात्री शेतावर जाण्यात विषारी जीवजंतू, जनावरांची भीती होती. त्यासाठी शासनाने शेतकऱ्यांचे फिडर हे सौर ऊर्जेवर नेण्याचे धोरण निश्चित केले. त्यातून एक लाख सोलर पंप ची योजना आखण्यात आली. ही योजना इतकी चांगली होती की, आपल्या राज्यातील ही योजना ही अन्य राज्यांनी जशीच्या तशी राबवावी,असे पत्र केंद्रांमार्फत इतर राज्यांना पाठविण्यात आले. त्यानुसार 'कुसूम' ही केंद्राची योजना तयार झाली. याच योजनेअंतर्गत आज देशात सर्वाधिक 7 लाख पंप राज्याने बसविले आहेत. शेतकऱ्यांनी मागणी केल्यापासून ते पंप बसविण्याच्या क्षमतेत वाढ करून आपण प्रतिक्षा कालाव…

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT