Devendra Fadnavis News Sarkarnama
महाराष्ट्र

Devendra Fadnavis News : राज्यातील महायुती सरकारला दोन वर्ष पूर्ण; फडणवीसांची पोस्ट चर्चेत

Sachin Waghmare

Mumbai News : राज्यातील महायुती सरकारला रविवारी दोन वर्ष पूर्ण झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेसबुक पोस्ट केली.

त्यामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्राची सर्वत्र पिछेहाट होत असताना विविध क्षेत्रात आणि सर्वच समाजघटकांसाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय आम्हाला घेता आले आणि ते अंमलात आणता आले. याचे अधिक समाधान वाटत असल्याचे सांगत त्यांनी पूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर निशाणा साधला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात राज्यातील महायुती सरकारला दोन वर्ष पूर्ण झाले. मी त्यांचे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit Pawar) आणि मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन करतो. राज्यातील महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचे सुद्धा मन:पूर्वक अभिनंदन त्यांनी पोस्टमध्ये केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे सातत्याने सहकार्य महाराष्ट्राला लाभले आणि लाभत आहे. 76,200 कोटींचे वाढवण बंदर याच महिन्यात मंजूर झाले. 10 लाख रोजगार यातून निर्माण होणार आहेत. त्यांचे आम्ही कायमच आभारी आहोत.

त्यासोबतच शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी, पीकविमा, दुष्काळ, सततचा पाऊस, अतिवृष्टीसाठी कोट्यवधीची मदत, मदतीच्या निकषात वाढ, आता वीजबिल माफी, सौरऊर्जेतून मोफत वीज, दूध, कापूस, सोयाबीनसाठी मदत, जलयुक्त शिवार, मराठवाडा वॉटर ग्रीड, सिंचनाच्या सव्वाशेहून अधिक प्रकल्पांना निधी आणि मंजुरी, महात्मा जोतिबा फुले जनारोग्य योजनेत 5 लाखांपर्यंत उपचार, महिलांना ST प्रवास अर्ध्या तिकिटात या लोकोपयोगी योजनेचा नागरिकांना फायदा झाला आहे.

त्याशिवाय सर्व सरकारी कागदपत्रांवर आईचे नाव, लखपती करणारी लेक लाडकी योजना, आता लाडकी बहिण योजना, वर्षातील 3 सिलेंडर देणारी अन्नपूर्णा योजना, निराधार योजना, पोलिस पाटील, ग्रामसेवक, अंगणवाडी, आशा सेविका अशा सर्व घटकांसाठी मानधन वाढ, पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्तीत 5 पट वाढ, आता मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना, विविध समाजघटकांसाठी महामंडळे, कल्याणकारी योजना, मोठी सरकारी पदभरती, पोलिस भरती, समृद्धी, अटलसेतू, कोस्टल रोड, मुंबईसह विविध शहरातील मेट्रो, रिंगरोडसारखे क्रांतिकारी पायाभूत सुविधा प्रकल्प, ग्रामसडक, भगवान बिरसा मुंडा जोडरस्ते योजना अंमलात आणल्या आहेत.

महाराष्ट्र सलग दोन वर्ष परकीय गुंतवणुकीत नंबर वन, सर्वाधिक स्टार्टअप महाराष्ट्रात, त्यासोबतच निर्णय, उपलब्धी अनेक आहेत. त्याची यादी न संपणारी आहे. महाराष्ट्रातील जनता भक्कमपणे महायुतीच्या पाठीशी आहे, हेच त्यांचे आम्हाला मोठे आशीर्वाद असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT