Maharashtra cabinet expansion News  Sarkarnama
महाराष्ट्र

Shahajibapu Patil : मी शहाजी राजाराम पाटील, मंत्री म्हणून शपथ...; फडणवीसांच्या आमदारांकडून शिंदेंचे शिलेदार धडा घेणार का?

Maharashtra cabinet expansion : भाजपच्या आमदारांसारखा संयम राखता आला नाही का?

अय्यूब कादरी

सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेच्या (शिंदे गट) ४० आमदारांपैकी अनेकांना मंत्रिपदाची स्वप्ने पडतात. त्यात वरचेवर भर पडत आहे. दुसरीकडे, १०५ आमदार असतानाही भाजपमध्ये शिस्त, संयम आहे. महायुतीचे सरकार आल्यापासून भाजपच्या एकाही आमदाराला मंत्रिपदाचे स्वप्न पडलेले नाही.आपण पुन्हा निवडून येऊ याची खात्री शिंदे गटातील आमदारांना नाही का? यामुळेच त्यांना भाजपच्या आमदारांसारखा संयम राखता आला नाही का? असे प्रश्न महाराष्ट्राला पडले आहेत.

गेल्यावर्षी सूरत, गुवाहाटी प्रकरण घडले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर अनेकांना मंत्रिपदाची स्वप्ने पडू लागली. शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले, संजय सिरसाट यांना वारंवार पडणाऱ्या स्वप्नांनी तर महाराष्ट्राला भंडावून सोडले आहे. आता त्यात भर पडली आहे काय झाडी, काय डोंगार... फेम आमदार शहाजी पाटील यांची. मंत्रिपदाची शपथ घेऊनच मी रोज झोपतो, असे काही दिवसांपूर्वी ते म्हणाले होते. ४० आमदारांच्या पक्षाची अशी गत झालेली असताना भाजपच्या १०५ आमदारांचा संयम निश्चितपणे वाखाणण्यासारखा आहे.

शिंदे गटातील आमदारांनी मात्र आपल्या सत्तेच्या हव्यासाचे जाहीर प्रदर्शन करून हसे करून घेतले आहे. या गटातील आमदार ठरावीक अंतराने या हव्यासाचे प्रदर्शन करत असतात. यापैकी संजय शिरसाट हे आता काहीसे शांत झाले असून, मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चिन्हे दिसत नसल्याने कदाचित त्यांनी आशा सोडून दिली असावी.

शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी तर काही दिवसांपूर्वी पंढरीच्या विठुरायाला मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी साकडे घातले. विठुराया या हा कष्टकरी, श्रमिकांचा देव आहे. तो गोगावले यांच्यासारख्या श्रीमंत आमदाराचे गाऱ्हाणे ऐकूण घेईल असे वाटत नाही. संजय शिरसाट अपेक्षा व्यक्त करून करून थकले आणि अखेर शांत झाले. आता या स्वप्नांच्या स्पर्धेत शहाजीबापू पाटील यांनी उडी घेतली आहे. सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आयोजित केलेल्या दिवाळी स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. मंत्रिपदाची आशा बाळगणारे अपक्ष आमदार बच्चू कडू हेही आता शांत झाले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कधी मंत्री होईन म्हणून रात्रभर स्वप्न पाहतो..

'मी शहाजी राजाराम पाटील..या राज्याचा मंत्री म्हणून शपथ घेतो की..' असे म्हणूनच रोज मी झोपतो, गुवाहाटीवरून आल्यापासून मी कधी मंत्री होईन म्हणून रात्रभर स्वप्न पाहतो, कधी कधी तर झोपेतूनही उठतो...असे ते म्हणाले होते. शिवसेनेतून बाहेर पडून गुवाहाटीला गेल्यानंतर तेथून केलेल्या काय झाडी, काय डोंगार...या वक्तव्यामुळे शहाजीबापू राज्यभर चर्चेत आले होते. त्यावरून त्यांच्यावर टीका झाली, तर काही जणांना त्यांचे तसे बोलणे आवडले होते.

१०५ आमदार असूनही कमी मंत्रिपदे का?

दुसरीकडे, म्हणजे भाजपच्या गोटात संयम, शांतता आहे. भाजप उद्दीष्ट समोर ठेवून वाटचाल करणारा पक्ष आहे. भाजपला महाराष्ट्रातील लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकायच्या आहेत, नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. यासाठी त्यांनी राजकीय तडजोड स्वीकारली आहे, सत्तेत दुय्यम स्थान स्वीकारले आहे. सत्ता पुन्हा येईल, समजा यावेळी नाही आली तर त्याच्या पुढच्या वेळी येईल, याचा त्यांना विश्वास आहे. त्यामुळेच १०५ आमदार असूनही आम्हाला इतकी कमी मंत्रिपदे का, असा प्रश्न भाजपच्या एकाही आमदाराने उपस्थित केला नाही. मला मंत्रिपदाचे स्वप्न पडत आहे, असे भाजपच्या एकाही आमदाराने एकदाही म्हटलेले नाही. अपवाद चंद्रकांतदादा यांच्या, आम्ही छातीवर दगड ठेवून हा निर्णय स्वीकारला या वक्तव्याचा. अन्यथा पक्षाने दिलेले ध्येय गाठण्यासाठी त्यांचे काम शांतचित्ताने सुरू आहे.

पुन्हा निवडून येण्याबाबत त्यांना विश्वास नाही...

शिंदे गटाची स्थिती नेमकी उलट आहे. शिवसेनेतून का बाहेर का पडलो, याची वेगवेगळी कारणे या गटातील आमदारांनी दिली आहेत. आपण पुन्हा निवडून येऊ, याबाबत त्यांना विश्वास नाही, असे त्यांच्या वागण्यावरून दिसून येते. उदाहरण शहाजीबापू यांचेच पाहू. गेल्या निवडणुकीत ते अत्यंत कमी फरकाने म्हणजे ७६८ मतांनी विजयी झाले होते. त्यांच्या विजयात राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक साळुंके यांची भूमिका महत्वाची होती. शिवाय शहाजीबापू हे काही सलग निवडून आलेले नाहीत. यापूर्वी एकदा ते काँग्रेसच्या उमेदवारीवर विजयी झाले होते.

...हे शहाजीबापूंच्या लक्षात आलेच नसेल

काय झाडी, काय डोंगार... या संवादापूर्वी त्यांची राज्याला फारशी ओळख असण्याचेही काहीही कारण नव्हते. म्हणजे ते काही दिग्गज राजकीय व्यक्तीमत्व वगैरे नाहीत. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही त्यांनी टीका केली. त्यांच्या टीकेतून अजितदादा पवारही सुटले नाहीत. त्यामुळे त्यांनी या दिग्गज नेत्यांची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची नाराजी ओढवून घेतली. आपण काय करतोय, हे शहाजीबापूंच्या लक्षात आलेच नसेल. शिवाय शिंदे गटाच्या राजकीय गुणधर्माचे वास्तव त्यांनी सर्वांसमोर आणले, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. गेल्या निवडणुकीत शहाजीबापू शिंदे यांच्या विजयात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष (अजितदादा गट) दीपक साळुंके यांनी महत्वाची भूमिका निभावली होती. आता आगामी निवडणूक लढवणारच असा निर्धार साळुंके यांनी केला आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार अशा दिग्गजांवर टीका करणारे शहाजीबापू आता साळुंके यांच्या भूमिकेमुळे मतदारसंघातच घेरले गेले आहेत.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT