मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पिंपरी चिंचवड येथील पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. त्यावर फडणवीस यांनीही मोजक्याच्या पण योग्य शब्दांत पलटवार केला आहे. त्याबाबत त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, साहेब....! जो बूँद से गयी; वो हौद से नहीं आती! (Devendra Fadnavis's reply to Sharad Pawar's criticism)
पिंपरी चिंचवडमध्ये बोलताना पवार यांनी आपल्या आग्रहामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारले आहे, त्यामुळे फडणवीस यांनी ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्याची घाई झाली होती, असे आरोप करू नयेत, असे फडणवीस यांना सुनावले. त्यावर फडणवीस यांनीही ट्विट करत पलटवार केला आहे. त्यात फडणवीस यांनी म्हटले आहे की, द्वापारयुगात सुईच्या टोकाएवढी जमीन द्यायला नकार दिल्यामुळे महाभारत घडले आणि कलियुगात मात्र तयार नसलेल्यांना हात धरून राज्य कारभाराला लावले, असे सांगणे म्हणजे किती हा भाबडेपणा? साहेब...! जो बूँद से गयी वो हौद से नहीं आती!
काय म्हणाले होते शरद पवार
महाविकास आघाडी अस्तित्वात आल्यानंतर मुख्यमंत्रीपद कोणाकडे द्यायचं, याची चर्चा सुरू होती. आमदारांच्या बैठकीत दोन-तीन नावे पुढे आली होती. पण, उद्धव ठाकरे ते स्वीकारायला तयार नव्हते. बैठकीत ते माझ्या शेजारी बसले होते, त्यावेळी मीच त्यांचा हात वर करून हेच मुख्यमंत्री होतील, असे जाहीर केले. ते हात वर करायला आणि मुख्यमंत्री व्हायला तयार नव्हते. मी आणि बाळासाहेब ठाकरे मित्र होतो. त्यांचे आणि त्यांच्या पक्षाचे महाराष्ट्रासाठी योगदान आहे. त्यांच्या पक्षाचे सर्वाधिक आमदार असल्याने आपल्या जुन्या मित्राच्या मुलाला मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी घ्यायला भाग पाडावं, असं मला वाटलं म्हणून मी त्यांचा हात वर केला. माझा आग्रह असल्याने त्यांनी ते मुख्यमंत्रीपद स्वीकारले. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपात अजिबात तथ्य नाही, असे सांगून शरद पवार यांनी फडणवीस यांचा आरोप खोडून काढला.
माझ्या आग्रहामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारले आहे. त्यामुळे फडणवीस यांना माझी विनंती आहे की, कृपया करून असे काही आक्षेप घेऊ नका. फडणवीस यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत अनेक वर्ष काम केले आहे. त्यांचे मित्रत्वाचे संबंध होते, त्यामुळे त्यांनी असे आरोप करणे मला योग्य वाटत नाही, असेही शरद पवार म्हणाले होते.
हे सर्वांत भ्रष्ट सरकार आहे. वसुली करण्यासाठी राज्यातील मंत्र्यांनी सॉफ्टवेअर तयार केले आहे, असा आरोप केला होता. त्याबाबत पवार म्हणाले की वसुलीची ती चीप अथवा सॉफ्टवेअर फडणवीस यांनी दाखवावं. त्यांनी ती चिप आम्हाला दाखवावी. ती कशी असते, ते आम्हालाही कळेल. मुख्यमंत्रीपद हे एक संस्था आहे. ते मुख्यमंत्री होते. पण, त्या पदाला एक मान-सन्मान आहे. मी पण त्या पदावर होतो, मात्र त्या पदाला फडणवीस धक्का पोचवत आहेत. मला फडणवीस यांच्याकडून हे अपेक्षित नव्हतं. पण सत्ता गेल्याचे दुःख त्यांना प्रचंड आहे. त्यातूनच त्यांना मी पुन्हा येईन असे वाटत असतं त्यामुळेच ते असे आरोप करत असतात, असाही टोला त्यांनी फडणवीस यांना लगावला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.