माळेगाव (जि. पुणे) : ‘‘बाळासाहेबांनंतर तावरे आडनाव सोडून माळेगाव कारखान्याचा अध्यक्ष असले असे मी सोमेश्वर साखर कारखान्याच्या सभेत बोलल्याची गोष्टी खरी आहे. पण, बाबांनो...हे होत असताना पवारसाहेबांनाही विचारावे लागणार आहे. पवारसाहेबांच्या मनात आले तरच तसे होणार आहे. असे असताना येथे मात्र काहींनी लगेच अध्यक्षपदासाठी तयारी सुरू केली, हे बरोबर नाही,’’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाळासाहेब तावरे यांचे अध्यक्षपद कायम ठेवले आणि अध्यक्षबदलाच्या चर्चेला सध्यातरी पूर्णविराम दिला. (Ajit Pawar's U-turn regarding the post of Malegaon Sugar Factory President)
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या ऊस गळीत हंगामाचा शुभारंभ शुक्रवारी (ता. १५ ऑक्टोबर) दसऱ्याच्या मुहूर्तावर उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते.
राष्ट्रवादीची सत्ता असो अथवा विरोधकांची...माळेगाव कारखान्याचा अध्यक्ष तावरे आडनावाचाच असतो. या राजकीय समीकरणावर मोठे भाष्य करीत खुद्द अजित पवार यांनी मागील महिन्यात ‘सोमेश्वर’च्या शेतकरी मेळाव्यात यापुढे तावरे आडनाव वगळून ‘माळेगाव’चा अध्यक्ष असेल,’ असे विधान केले होते. त्या विधानाचे पडसाद ‘माळेगाव’च्या कार्यक्षेत्रात उमटले होते. विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब तावरेंनंतर ‘माळेगाव’चे अध्यक्ष कोण? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. ज्येष्ठ संचालक ॲड केशवराव जगताप, संचालक योगेश जगताप, मदनराव देवकाते, नितीन सातव आदी संचालकांपैकी एकाला अध्यक्षपद मिळू शकते, याबाबतच्या चर्चेने जोर धरला होता. तोच धागा पकडत कारखान्याच्या मोळी टाकण्याच्या कार्यक्रमात पवार यांनी बाळासाहेब तावरेंच्या अध्यक्षपदाबाबत निर्णायक भूमिका मांडली.
माळेगाव कारखान्याचे विस्तारीकरण होत असताना विरोधकांनी पाहिजे तेवढे लक्ष न दिल्याने कारखान्यात यंत्रसमुग्री निकृष्ठ दर्जाची बसवली गेली. परिणामी २०१९-२० च्या हंगामात कारखान्याचे प्रचंड मोठे नुकसान झाले. त्या नुकसानीची आकडेवारी पवार सभासदांपुढे सांगत असताना अचानकपणे संचालक योगेश जगताप यांनी काही आकडेवारी सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर पवार म्हणाले, ‘‘अरे योगेश... तुझा कारखान्याचा लईचं अभ्यास झाला रे...चेअरमनपदापर्यंत ठीक आहे. पण, आमदारकीकडे घुसू नको, म्हणजे झाले.’’ अजित पवारांच्या त्या गंमतीदार गुगलीवर सभागृहात एकच हशा पिकला. एवढ्यावरच न थांबता पवार म्हणाले, बाळासाहेबांचे जरी वय झाले असले तरी त्यांची तब्येत अजूनही ठणठणीत आहे आणि त्यांचे कामही चांगले आहे. त्यांची तब्येत चांगली आहे; तोपर्यंत त्यांना काम करू द्या.
अजित पवार यांच्या या विधानामुळे माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष बदलण्याच्या चर्चेला सध्यातरी पूर्णविराम मिळाला आहे. विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब तावरे हेच यापुढेही काही दिवस कारखान्याचे काम पाहतील, असे पवार यांनी अप्रत्यक्षपणे स्पष्ट केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.