राज्यात 23 फेब्रुवारीला झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषतः मराठवाड्यातील बीड, लातूर, परभणी, धाराशिव आणि नांदेड या जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. याशिवाय कोकण आणि पूर्व विदर्भातील काही भागांमध्येही रब्बी हंगामातील पिके जमीनदोस्त झाली आहेत. गहू, ज्वारी, हरभरा, भाजीपाला तसेच आंबा, डाळिंब, द्राक्ष आणि टरबूज यांसारख्या फळपिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर माजी मंत्री तसेच परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधले. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची तातडीने दखल घेऊन संबंधित जिल्ह्यांत पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत, अशी त्यांची ठाम मागणी होती. शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळण्यासाठी प्रशासनाने विलंब न करता प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानाचा अहवाल सादर करावा, असे त्यांनी सभागृहात स्पष्टपणे सांगितले.
मुंडे यांनी विशेषतः बीड जिल्ह्यातील परळी, अंबाजोगाई, माजलगाव, धारूर आणि केज या तालुक्यांचा उल्लेख करत तेथील परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे नमूद केले. अनेक ठिकाणी काढणीला आलेली पिके पूर्णपणे आडवी झाली असून फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. शासनाने तात्काळ मदतीची प्रक्रिया सुरू करावी, अन्यथा शेतकऱ्यांचा रोष वाढेल, असा इशाराही त्यांनी दिला.
यावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात उत्तर देताना मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून सर्व नुकसानग्रस्त जिल्ह्यांच्या प्रशासनाला त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या जातील, अशी ग्वाही दिली. ज्या ज्या भागांत अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे, त्या सर्व ठिकाणी अधिकाऱ्यांनी तत्काळ पाहणी करून अहवाल सादर करावा, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत या नैसर्गिक आपत्तीमुळे आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. लातूर, नांदेड, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये फळबागा आणि उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत देणे गरजेचे असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.