

Ashok Chavan News : नगरपालिका, नगरपंचायत, महापालिका निवडणुकीत नांदेड जिल्ह्यात पक्षाला घवघवीत यश मिळवून दिल्यानंतर खासदार अशोक चव्हाण यांचे पक्षात वजन वाढले आहे. महापालिका पहिल्यादांच भाजपाच्या ताब्यात आली असून बहुमतासह इथे पक्षाने आपला महापौर बसवला आहे. तर त्याआधी जिल्ह्यातील तीन तालुक्यात भाजपाचे नगराध्यक्ष आणि सत्ता आली. अर्थात या निवडणुकीची सगळी सूत्रं पक्षाने अशोक चव्हाण यांच्याकडेच सोपवली होती.
पक्षाला जिल्ह्यात चांगले यश मिळवून दिल्यानंतर आता नांदेडमध्ये अशोक चव्हाण म्हणतील तेच भाजपाचे नेते मान्य करत असल्याचे दिसून आले आहे. प्रदेश कार्यकारिणीमध्येही चव्हाण यांचीच मर्जी चालल्याचे जाहीर झालेल्या नावांवरून स्पष्ट झाले आहे. नांदेड जिल्ह्याला दोन प्रदेश उपाध्यक्ष मिळाले आहेत. अशोक चव्हाण यांचा भाजपामध्ये प्रवेश झाल्यापासून जिल्ह्यात निष्ठावंत आणि नव्याने पक्षात दाखल झालेले चव्हाण समर्थक अस दोन गट पडल्याची चर्चा होती.
नगरपालिका, नगरपंचयात, महापालिकेतही उमेदवार देताना अशोक चव्हाण यांनी अंतिम केलेल्या यादीवरच वरिष्ठ नेत्यांकडून शिक्कामोर्तब करण्यात आले होते. त्यामुळे अनेक निष्ठावंतामध्ये डावलल्याची भावना निर्माण झाली होती. परंतु प्रदेश कार्यकारिणीत निष्ठावंतांना स्थान देत पक्षाने जुन्या नव्यांचा समतोल साधल्याचे दिसते. प्रदेश उपाध्यक्ष पदावर प्रदेश कार्यकारिणी सदस्य चैतन्य बापू देशमुख आणि मराठवाड्याचे संघटन मंत्री संजय कौडगे या दोघांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नांदेड जिल्ह्याला दोन प्रदेश उपाध्यक्ष मिळाल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आतापर्यंत संघटनात्मक बांधणीमध्ये अशोक चव्हाण यांचा वरचष्मा दिसून आला आहे. महानगरप्रमुख पदासह शहरातील महत्त्वाच्या पदावर चव्हाण समर्थकांची वर्णी लागली होती. माजी आमदार अमर राजूरकर यांना महानगरप्रमुख करत अशोक चव्हाण यांनी नांदेड शहराची सगळी सूत्रं आपल्या हाती ठेवली होती.
नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत आणि त्यानंतरच्या महापालिका निवडणुकीत उमेदवार निवडीपासून तर त्यांच्यासाठीची प्रचार यंत्रणा राबवणे, सभा, पदयात्रा अशा सगळ्याच गोष्टींवर अशोक चव्हाण यांचा अंकुश होता. अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये असताना ज्या स्थानिक स्वराज्य संस्थावर कायम त्यांचा झेंडा फडकायचा, त्या सगळ्या ठिकाणी आता भाजपचे कमळ फुलले आहे.
अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशानंतर पहिल्यांदाच नांदेड महापालिकेत पक्षाची शतप्रतिशत सत्ता स्थापन होऊ शकली आहे. पक्षातंर्गत गटबाजी, नाराजी, कुरबुरी यावर मात कर अशोक चव्हाण यांनी आपला सगळा राजकीय अनुभव कामी लावून हे यश भाजपासाठी खेचून आणले होते. या दरम्यान, नाराज झालेल्या निष्ठावंतांची नाराजीही या दोन प्रदेश उपाध्यक्षांच्या नियुक्तीने काही प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.