Dhananjay Munde : मंत्रिपदाचा राजीनामा देऊन 7 महिने उलटल्यानंतरही धनंजय मुंडे 'सातपुडा' हे शासकीय निवासस्थान कधी सोडणार? असा प्रश्न विचारला जात होता. अखेर मुंडे यांना बंगला सोडण्यासाठी मुहूर्त सापडला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या 30 सप्टेंबरपर्यंत ते सरकारी 'सातपुडा बंगला' खाली करणार आहेत. त्यानंतर काही किरकोळ बदल करून बंगला मंत्री छगन भुजबळ यांना दिला जाणार आहे.
धनंजय मुंडे यांनी 4 मार्च रोजी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी 14 दिवसांमध्ये बंगला सोडणे अपेक्षित होते. मात्र मुंबईमध्ये आपल्याकडे राहण्यासाठी घर नाही, असे सांगून पुढील सोय होईपर्यंत बंगल्यातच राहण्याची भूमिका मुंडे यांनी घेतली होती. त्यामुळे मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारुन सुमारे 4 महिन्यांचा कालावधी लोटला तरी त्यांना सरकारी निवासस्थान मिळू शकले नव्हते.
आता धनंजय मुंडे 30 सप्टेंबरपर्यंत सातपुडा बंगला सोडणार आहेत. त्यानंतर बंगल्यात भुजबळ यांना अपेक्षित असलेले काही बदल केले जातील. त्यानंतर बंगल्याचा ताबा भुजबळ यांना दिला जाईल. मुंडे आणि भुजबळ यांच्या कार्यालयातील टीम याबाबत एकमेकांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे या महिन्याच्या अखेरीस या सरकारी बंगल्याचा ताबा भुजबळांकडे हस्तांतरित केला जाण्याची शक्यता आहे.
50 लाख रुपयांचे भाडे माफ होणार?
मंत्री किंवा अधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यानंतर 14 दिवसांत शासकीय बंगला रिकामा करण्याचा नियम आहे. त्यानंतरही बंगला न सोडल्यास संबंधित व्यक्तीकडून भाडे आणि दंड वसुली केली जाते. आता मंत्रिपदी नसतानाही धनंजय मुंडे यांनी बंगला न सोडल्याने त्यांच्याकडे जवळपास 50 लाख रुपयांचे भाडे आणि दंड येणे राज्य सरकारला बाकी आहे.
आता हे भाडे माफ केले जाण्याची शक्यता आहे. अद्यापही थकीत भाडे भरावे यासाठी धनंजय मुंडे यांना शासनाकडून कोणतीही नोटीस पाठवली नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे भाडेवसुली होणार नसल्याचे बोलले जाते. दरम्यान, हे भाडे माफ झाल्यास, शासन दरबारी नवा पायंडा पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
धनंजय मुंडे आता कुठे राहणार?
धनंजय मुंडे यांचा गिरगाव चौपाटीजवळ वीरभवन येथील 22 मजली इमारतीमध्ये तब्बल 16 कोटींचा फ्लॅट आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीवेळी जे प्रतिज्ञापत्र दिले होते त्यामध्ये देखील या फ्लॅटचा उल्लेख आहे. त्यांनी 2023 मध्ये या फ्लॅटची खरेदी केली होती. 2 हजार 151 चौ.फुटांचा हा फ्लॅट असून त्यामध्ये 4 बेडरुम असल्याची माहिती आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.