dharashiv News : धाराशिव मतदारसंघातील महायुतीचा तिढा अखेर सुटला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपचे तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या सौभाग्यवती, धाराशिव जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चना पाटील यांना महायुतीची अधिकृत उमेदवारी दिली.
धाराशिवची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आल्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरुवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी जाहीर केली. रायगड व शिरूर, बारामतीमधील उमेदवारीची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वीच केली आहे.
धाराशिवची जागा महायुतीच्या जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत अर्चना पाटील यांच्या नावाची घोषणा केली. तत्पूर्वी गुरुवारी अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. (Dharashiv Lok Sabha News )
या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला होता. त्यामुळे ही जागा कोणाला मिळणार याची उत्सुकता लागली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वीच रायगडमधून सुनील तटकरे यांना तर शिरूरमधून शिवाजी आढळराव पाटील, बारामतीमधून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिल्याची घोषणा केली आहे.
महायुतीमध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेल्यानंतर आता उमेदवार कोण असणार यावरून मोठी चर्चा रंगली होती. धाराशिव लोकसभेसाठी या वेळी चर्चेत असलेल्या आमदार सतीश चव्हाण (Satish Chavan), सुरेश बिराजदार (Suresh Birajdar), प्रवीणसिंह परदेशी, आमदार विक्रम काळे (Vikarm kale) यांच्या नावावर चर्चा झाली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
गेल्या बुधवारी महाविकास आघाडीतील शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाली होती. त्यामुळे त्यांच्या विरोधात कोण रिंगणात उतरणार याचा शोध जवळपास संपला असून, गुरुवारी त्यांच्या विरोधातील उमेदवार ठरला आहे. अर्चना पाटील यांना महायुतीची अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्याने त्यावरील सस्पेन्स संपला आहे.
R