Marathwada Political News : उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीच्या उमेदवाराची आज घोषणा होण्याची शक्यता होती, मात्र ती पुन्हा एकदा टळली आहे, अशी विश्वसनीय माहिती आहे. भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या सौभाग्यवती अर्चनाताई पाटील यांचा 2 एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होता, मात्र तो टळला आहे. प्रवेश केल्यानंतर त्यांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर केली जाणार आहे.
धाराशिव जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष, भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील (Ranajagjeetsingh Patil) यांच्या सौभाग्यवती अर्चनाताई पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन मंगळवारी (ता. २) त्यांची उमेदवारी जाहीर केली जाणार होती, मात्र अंतर्गत कुरबुरी आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे मुंबईच्या बाहेर असल्याचे कारण देत त्यांचा प्रवेश लांबणीवर पडला आहे.
इच्छुकांची संख्या अधिक असल्यामुळे महायुतीत या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी द्यायची, याचा तिढा अगदी सुरुवातीपासून निर्माण झाला आहे. मात्र, महायुतीत अंतर्गत कुरबुरी असल्याचेही आता समोर येऊ लागले आहे. मतदारसंघ भाजपला सुटेल, असे गृहीत धरून सेवानिवृत्त आयएएस अधिकारी प्रवीणसिंह परदेशी (Pravinsigh Pardeshi) यांनी जय्यत तयारी केली होती. परदेशी हे 'मित्रा'चे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्या यंत्रणेच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने परदेशी यांनी मतदारसंघ पिंजून काढला होता. मात्र, मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्यामुळे परदेशी उमेदवारीच्या स्पर्धेतून बाजूला झाले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही या मतदारसंघासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती, मात्र मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटला आणि शिवसेनेलाही माघार घ्यावी लागली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महायुतीत दिग्गज, चाणाक्ष नेत्यांची मांदियाळी आहे, मात्र त्यांना उमेदवारीचा तिढा काही लवकर सोडवता आलेला नाही. परदेशी यांच्यासह भाजपकडून अनेकजण इच्छुक होते. शिवसेनेकडून माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड, पालकमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचे पुतणे धनंजय सावंत इच्छुक होते. राष्ट्रवादीकडून प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांनी तयारी सुरू केली आहे. त्यांना अजितदादा पवार यांच्याकडूनच सिग्नल मिळाला होता. त्यानंतर मात्र अचानकच मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांची नावे समोर आली.
काळे, चव्हाण यांची नावे आता मागे पडली आहेत. त्यानंतर अर्चनाताई पाटील (Archana Patil) यांचे नाव समोर आले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करायचा आणि मग उमेदवारी जाहीर करायची असे ठरले होते. 1 एप्रिल रोजी अजितदादा मुंबईबाहेर असल्यामुळे त्यांचा प्रवेश 2 एप्रिल रोजी ठरला होता. मात्र, 2 एप्रिल रोजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे मुंबईबाहेर असल्याने पुन्हा प्रवेश सोहळा टळल्याचे सांगितले जात आहे.
महायुतीतील शिंदे गटातील एका बड्या नेत्याने अर्चनाताई पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर आक्षेप घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आयात उमेदवार कशाला द्यायचा, संबंधित पक्षातीलच उमेदवार द्यावा, असे त्या नेत्याचे म्हणणे आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारीची घोषणा पुन्हा एकदा टळली आहे. मुंबईत काय निर्णय होतो, याकडे डोळे लावून बसलेल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांचा पुन्हा एकदा भ्रमनिरास झाला आहे. महाविकास आघाडीतील शिवसेनेचे उमेदवार खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हाती मात्र यामुळे आयतेच कोलित मिळाले आहे. निवडणुकीच्या प्रचारात ते याचा प्रभावीपणे वापर करू शकतात.
महायुतीची प्रत्येक मतदारसंघात समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची मतदारसंघनिहाय बैठक जवळपास दोन महिन्यांपूर्वी झाली आहे. या बैठकांच्या माध्यमातून महायुतीने नियोजनाचा बडेजाव दाखवला, प्रत्यक्षात राज्यातील अनेक मतदारसंघात महायुतीला अद्यापही उमेदवार निश्चित करणे शक्य झालेले नाही. धाराशिव मतदारसंघातही अशीच परिस्थिती आहे. उमेदवार जाहीर करणयासाठीचा विलंब महायुतीला महागात पडू शकतो. माझ्यासमोर लढण्यासाठी महायुतीकडे उमेदवारच नाही, अशी टीका महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली होती. महायुतीकडून उमेदवार निश्चितीसाठी होत असलेला विलंब राजेनिंबाळकर यांच्या पथ्यावर पडणारा आहे. त्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
(Edited by Sunil Dhumal)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.