School Bus Sarkarnama
महाराष्ट्र

Diesel Price Hike Impact Students : डिझेल दरवाढ अन् तुटवड्याचा विद्यार्थ्यांवरही परिणाम : शाळा पुन्हा ऑनलाईन भरवण्याच्या दिशेने विचार सुरु

Diesel price hike impact on students : डिझेल दरवाढ आणि तुटवड्यामुळे विद्यार्थ्यांच्या वाहतुकीवर परिणाम होत असून महाराष्ट्रातील शाळा पुन्हा ऑनलाईन वर्ग सुरू करण्याच्या विचारात आहेत.

Rashmi Mane

राज्यात वाढत असलेल्या डिझेल आणि पेट्रोलच्या दरांचा फटका आता शिक्षण व्यवस्थेलाही बसू लागला आहे. नव्या शैक्षणिक सत्राला सुरुवात होण्याआधीच स्कूल बस चालक आणि मालक आर्थिक अडचणीत सापडले असून, त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या वाहतुकीवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाढत्या इंधन खर्चामुळे जुन्या दरात बस सेवा चालवणे शक्य नसल्याचे बस संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे आठवड्यातील काही दिवस प्रत्यक्ष शाळा आणि उर्वरित दिवस ऑनलाइन वर्ग असा पर्याय सरकारने विचारात घ्यावा, अशी मागणी पुढे येत आहे.

स्कूल बस संघटनांनी राज्य सरकारकडे तातडीने भूमिका स्पष्ट करण्याची विनंती केली आहे. जून महिन्यापासून शाळा सुरू होणार असताना बस सेवेचे शुल्क वाढवावे लागणार असल्याचे संकेत संघटनांकडून देण्यात आले आहेत. इंधन दरवाढीमुळे बस चालकांचे खर्च मोठ्या प्रमाणात वाढले असून, सरकारने अनुदान किंवा कर सवलती देऊन दिलासा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

मागील 10 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 4 वेळा वाढ झाली आहे. पेट्रोलमध्ये जवळपास 7.38 रुपये तर डिझेलमध्ये 7.09 रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. अनेक शहरांमध्ये पेट्रोलचा दर 110 रुपयांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे वाहतूक व्यवसायावर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला आहे.

नागपुरात स्कूल बस आणि व्हॅन संघटनांनी 10 ते 15 टक्के भाडेवाढ जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पालकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे. पूर्वी 1000 रुपये भाडे देणाऱ्या पालकांना आता 1200 रुपये मोजावे लागू शकतात, तर 2000 रुपयांच्या सेवेसाठी 2400 रुपये द्यावे लागू शकतात. या प्रस्तावित दरवाढीला परिवहन विभाग मंजुरी देतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, विदर्भात उष्णतेची लाट कायम असल्याने शाळा सुरू होण्याची तारीखही पुढे ढकलली जाऊ शकते. अनेक भागांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. परिस्थिती कायम राहिल्यास शाळा 15 जूनऐवजी 26 जूनपासून सुरू करण्याबाबत सरकारमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. शालेय शिक्षण विभाग यासंदर्भात लवकरच बैठक घेऊन अंतिम निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगितले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT