Nawab Malik sarkarnama
महाराष्ट्र

"बोलणं थांबवा, अन्यथा..." : न्यायाधीशांचा नबाव मलिकांना गंभीर इशारा

Sameer Wankhede Vs Nawab Malik : तुम्हाला नेमकं काय साध्य करायचं आहे?

सरकारनामा ब्युरो

मुंबई : अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे (NCB) तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडे, त्यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या अवमान याचिकेवर सध्या मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) सुनावणी सुरु आहे. यावेळी नवाब मलिक (Nawab Malik) यांना उच्च न्यायालयाने काही खडे सुनावले आहेत. तसेच वानखेडेंबाबत वारंवार वक्तव्य करून तुम्हाला काय साध्य करायचं आहे? अशी स्पष्ट विचारणा उच्च न्यायालयाने मंत्री मलिक यांना केली आहे.

आज उच्च न्यायालयात न्यायमूर्ती एस.जे. काथावाला आणि मिलिंद जाधव यांच्या खंडपीठापुढे सुनावणी पार पडली. यादरम्यान मलिक यांना हा प्रश्व विचारला. तसेच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे, नवाब मलिक सातत्याने ज्ञानदेव वानखेडेंची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यातून मलिक यांना नेमके काय साध्य करायचे आहे. हे अविरत चालू राहणे योग्य नाही, कुठेतरी थांबवायला हवे, अन्यथा तुम्हाला वानखेडेंबाबत बोलायची दिलेली सूटच काढून घ्यावी लागेल", असे उच्च न्यायालयाने नवाब मलिकांना सुनावले.

ज्ञानदेव वानखेडे यांनी मागील महिन्यात मुंबई उच्च न्यायालयात मंत्री मलिक यांच्या विरोधात अवमान याचिका दाखल केली आहे. यात मंत्रा नवाब मलिक यांनी मागच्या वर्षी न्यायालयात वानखेडे कुटुंबियांविरोधात कोणतेही अपमानजनक भाष्य न करण्याचे किंवा सोशल मीडियावर बदनामीकारक टिप्पणी न करण्याचे मान्य केले होते. मात्र मलिक यांनी या आश्वासनाचे २ आणि ३ जानेवारी रोजी जाणिवपूर्वक उल्लंघन केले आहे, असा आरोप या याचिकेमध्ये करण्यात आला आहे.

याशिवाय मागच्या वर्षी देखील ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक खटला दाखल करुन नवाब मलिक यांना सार्वजनिक ठिकाणी किंवा सोशल मिडीयावर वानखेडे कुटुंबियांविरुद्ध बोलण्यापासून थांबवावे, अशी मागणी केली होती. न्यायालयाच्या या आक्रमक पवित्र्यानंतर नवाब मलिकांचे वकिल रमेश दुबे यांनी अवमान याचिकेला उत्तर दाखल देण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागून घेतला आहे. या प्रकरणी ते ५ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार असून पुढील सुनावणी ७ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT