Ex-Rajya Sabha member Dr Gopalrao Patil passes away Sarkarnama
महाराष्ट्र

Dr Gopalrao Patil Passes Away : 'लातूर पॅटर्न'चे शिल्पकार माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन; परिसरात शोककळा

Dr Gopalrao Patil Death: लातूर पॅटर्नचे शिल्पकार आणि माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांचे निधन झाले असून महाराष्ट्रभर शोककळा पसरली आहे.

Rashmi Mane

Dr Gopalrao Patil Death: लातूर पॅटर्नचे शिल्पकार, माजी खासदार आणि शिक्षण क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व डॉ. गोपाळराव विठ्ठलराव पाटील यांचे मंगळवारी सकाळी 7.12 वाजता निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. त्यांच्या जाण्याने लातूरसह संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून शिक्षण आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रांमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

3 ऑक्टोबर 1931 रोजी जन्मलेले डॉ. गोपाळराव पाटील हे व्यावसायिकरित्या बालरोगतज्ज्ञ होते. मात्र, त्यांनी आपले आयुष्य शिक्षणाच्या उन्नतीसाठी वाहून घेतले. शिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी लातूरमध्ये शिक्षणाचा मजबूत पाया घातला.

त्यांच्या दूरदृष्टीतूनच प्रसिद्ध ‘लातूर पॅटर्न’ विकसित झाला, ज्यामुळे ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळाली. या पद्धतीमुळे अनेक विद्यार्थी अधिकारी, डॉक्टर आणि अभियंता बनले.

राजकीय क्षेत्रातही त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले. मराठवाड्यात भारतीय जनता पक्षाचा पाया मजबूत करण्यासाठी त्यांनी मोठे काम केले. लातूर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या विरोधात अनेक वेळा निवडणूक लढवली.

1991 ते 1999 या कालावधीत त्यांनी चार वेळा लोकसभा निवडणुका लढवल्या. 1998 मधील निवडणुकीत त्यांचा पराभव अत्यंत कमी मतांनी झाला होता. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना राज्यसभेवरही संधी देण्यात आली होती.

1994 ते 2000 या कालावधीत राज्यसभा सदस्य म्हणून त्यांनी वाणिज्य, परराष्ट्र व्यवहार आणि रेल्वे यांसारख्या महत्त्वाच्या समित्यांवर काम केले. त्यांच्या कार्यशैलीत सातत्य, प्रामाणिकपणा आणि समाजसेवेची तळमळ दिसून येत होती.

डॉ. गोपाळराव पाटील यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी 5 वाजता नवीन एमआयडीसी परिसरातील शिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या क्रीडांगणावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी शांताबाई पाटील, एक मुलगा आणि तीन मुली असा परिवार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT