

Latur News: लातूर म्हटलं की पटकन दोन नावं समोर येतात. पहिलं माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं आणि दुसरं म्हणजे राजर्षि शाहू महाविद्यालय! वैद्यकीय, अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी या महाविद्यालयाची राज्यभरात ख्याती झाली आहे. राज्यात शिक्षणाचा 'लातूर पॅटर्न' याच महाविद्यालयामुळे नावारूपाला आला. बारावीच्या निकालात या महाविद्यालयाचा राज्यभरात दबदबा आहे. त्यामुळे या महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडते. विलासराव देशमुख राज्याचे दोनवेळा मुख्यमंत्री झाले. राजकारणात त्यांचं आगळंवेगळं स्थान आहे.
ऑगस्ट 2024 मध्ये शाहू महाविद्यालय वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आलं. शिवछत्रपती शिक्षण संस्थेमार्फत हे महाविद्यालय चालवलं जातं. या संस्थेत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप संस्थेचे अध्यक्ष, भाजपचे राज्यसभेचे माजी खासदार गोपाळराव पाटील यांनी केला होता. संचालकांनी त्यांच्या आरोपांना उत्तर दिलं. या निमित्ताने डॉ. गोपाळराव पाटील ऊर्फ आप्पा यांचं नाव पुन्हा चर्चेत आलं.
उस्मानिया विद्यापीठातून एमबीबीएस, डीसीएच केलेल्या आप्पांनी कर्नूलसह कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाडला वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केलं. नंतर ते लातूर येथे आले आणि वैद्यकीय व्यवसायात स्थिरावत अवघ्या लातूर जिल्ह्याचे आप्पा बनले. वैद्यकीय, शैक्षणिक क्षेत्रात नाव लौकिक प्राप्त केल्यानंतर आप्पांनी चारित्र्य संपन्न राजकीय नेते, अशीही स्वतःची ओळख निर्माण केली.
डॉ. गोपाळराव पाटील हे मूळचे धाराशिव जिल्ह्याच्या उमरगा तालुक्यातील कवठा गावाचे रहिवासी आहेत. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (vilasrao Deshmukh) यांचे ते चुलत मामा. असं असलं तरी डॉ. पाटील हे सुरुवातीपासूनच भाजपमध्ये आहेत. व्यवसायाने बालरोगतज्ञ असलेल्या डॉ. पाटील यांनी रुग्णसेवेतही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेली आहे.
डॉ. पाटील यांनी लातूर लोकसभा मतदारसंघातून चार वेळेस निवडणूक लढवली, मात्र ते विजयी होऊ शकले नाहीत. चारही निवडणुकींमध्ये देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. विशेष म्हणजे, त्यावेळी उमरगा तालुका हा लातूर लोकसभा मतदारसंघाला जोडलेला होता. डॉ. पाटील यांचं कवठा गाव लातूर लोकसभा मतदारसंघातच होतं.
लोकसभेच्या सलग चार निवडणुकांमध्ये पराभूत झाले तरी डॉ. पाटील हे भाजपसाठी महत्वाचे नेते आहेत. मराठवाड्यात त्या काळात काँग्रेसचा जोर होता. लातूर जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर (Shivajirao Patil Nilangekar) यांच्यासारखे काँग्रेसचे दिग्गज नेते होते. अशा काळात भाजपला रुजवण्यात डॉ. पाटील यांचा मोठा पुढाकार होता. त्यामुळेच पक्षानं त्यांना राज्यसभेवर संधी दिली होती.
काँग्रेसचे दिग्गज नेते शिवराज पाटील चाकूरकर हे लातूर लोकसभा मतदारसंघातून सलग सातवेळा विजयी झाले होते. त्यापैकी चार निवडणुकांमध्ये त्यांची डॉ. गोपाळराव पाटील यांच्याशी लढत झाली होती. भाजपने पहिल्यांदा 1991 मध्ये डॉ. पाटील यांना चाकूरकर यांच्या विरोधात रिंगणात उतरवलं होतं. त्या निवडणुकीत शिवराज पाटील चाकूरकर यांना 2,37,853 मते मिळाली तर डॉ. गोपाळराव पाटील यांना 1,79,135 मते मिळाली. डॉ. पाटील यांचा 58,718 मतांनी पराभव झाला.
त्यानंतर 1996 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने डॉ. पाटील यांनाच उमेदवारी दिली. त्या निवडणुकीत त्यांचा तब्बल 79 हजार मतांनी पराभव झाला. 1998 च्या निवडणुकीत मात्र त्यांचा निसटता पराभव झाला. चाकूरकर यांना 3,22,265 तर डॉ. पाटील 3,18,938 मते मिळाली. केवळ 3327 मतांनी डॉ. पाटील पराभूत झाले. पुढे 1999 च्या निवडणुकीतही चाकूरकर यांनी डॉ. पाटील यांचा 40 हजार मतांनी पराभव केला. त्यानंतर डॉ. पाटील यांना भाजपनं राज्यसभेवर संधी दिली. पुढच्या निवडणुकीत भाजपनं उमेदवार बदलला. रूपाताई पाटील निलंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली. रूपताई यांनी 2004 च्या निवडणुकीत चाकूरकर यांचा पराभव केला होता.
कवठा येथील आध्यात्मिक, परोपकारी कुटुंबात गोपाळराव यांचा 3 ऑक्टोबर 1931 रोजी जन्म झाला. तेरणा नदीकाठावर वसलेल्या या गावाला ऐतिहासिक वारसा आहे. गावात प्राचीन काळातील मंदिरं आहेत. गोपाळराव यांचे वडील विठ्ठलराव पाटील यांना समाजात मान होता, तो त्यांच्या दानशूर वृत्तीमुळे. शालेय जीवनातच गोपाळराव यांची चौकस बुद्धी, त्यांच्या हुशारीची चुणूक दिसून आली होती. संयुक्त कुटुंबात वाढल्यामुळे त्यांच्या अंगी समंजसपणाही वाढत गेला. आठ, नऊ वर्षांच्या वयातच त्यांना संस्कृत श्लोक तोंडपाठ झाले होते.
पुढे विठ्ठलराव यांनी गोपाळराव यांच्यासह आपल्या तिन्ही मुलांना शिक्षणासाठी लातूर येथे ठेवलं. त्यासाठी त्यांनी भाड्यानं एक घर घेतलं होतं. मारवाडी राजस्थान विद्यालयात गोपाळराव यांचे शिक्षण सुरू झाले. तेथे त्यांनी अल्पावधीत शिक्षकांची मने जिंकली. काही अडचणींमुळे गोपाळराव आणि त्यांच्या भावंडांना नंतर बाभळगाव येथे नातेवाईकांकडे राहावं लागलं. तेथून शाळेसाठी ते लातूरला ये-जा करत असत. शिक्षक सेवा वृत्तीने काम करण्याचा तो काळ होता.
शिक्षक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष द्यायचे, त्यांच्यातील गुण हेरायचे, त्यांच्या आवडी निवडी जाणून घ्यायचे आणि ते गुण विकसित करण्यासाठी प्रयत्न करायचे. यातूनच गोपाळराव हे इंग्रजी विषयात निपुण झाले. ते अत्यंत हुशार असल्यामुळे त्यांना पाचवीतून थेट सातवीत प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र गोपाळराव यांनी त्याला नम्रपणे नकार दिला होता, असा उल्लेख त्यांच्यावर लिहिण्यात आलेल्या 'कर्मयोगी डॉ. गोपाळराव पाटील' या पुस्तकात आहे. विद्याधर कांदे-पाटील यांनी हे पुस्तक लिहिलं आहे.
गोपाळराव पाटील (आप्पा) यांचं तिसरी ते आठवीपर्यंतचं शिक्षण लातुरात झालं. त्याच काळात रझाकारांच्या कारवाया वाढल्या होत्या. त्यामुळे आप्पांना पुढील शिक्षणासाठी सोलापूरला ठेवण्यात आलं. सोलापूर येथील हरिभाई देवकरण प्रशालेतून ते दहावी उत्तीर्ण झाले. पुढे त्यांनी हैदराबाद येथील निझाम कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. नंतर त्यांनी वैद्यकीयचं शिक्षण पूर्ण केलं. ग्रामीण भागात आरोग्य सुविधांची गरज लक्षात घेऊन त्यांनी हा निर्णय घेतला होता. हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातूनच त्यांनी 'एमबीबीएस'नंतर 'डीसीएच' (बालरोगतज्ज्ञ) अभ्यासक्रम पूर्ण केला. पदव्युत्तर शिक्षणासाठी परदेशी जाण्याची त्यांची इच्छा होती, मात्र काही कारणांमुळे ती पूर्ण होऊ शकली नाही.
वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी हैदराबाद परिसर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड येथे काही वर्षे शासकीय वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केलं. 1965 मध्ये शासकीय नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी गाव जवळ केलं, म्हणजे ते लातूरला आले. लातूर येथे त्यांनी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. प्रदीर्घ वैद्यकीय सेवेत त्यांनी रुग्णांना शक्यतो अॅडमिट करून घेतलेच नाही, आंतररुग्ण सुविधाही ठेवली नाही, असा उल्लेख त्यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकात आढळून येतो. आजारी मुलांवर परिपूर्ण उपचार करण्याची काळजी त्यांनी नेहमीच घेतली.
पुढे 1991 मध्ये डॉ. गोपाळराव पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. चारित्र्यसंपन्न राजकीय नेते, अशी त्यांची ओळख निर्माण झाली. तत्पूर्वी, शिवछत्रपती शैक्षणिक संस्थेच्या माध्यामातूनही त्यांनी नावलौकिक मिळवला होता. त्या काळात लातूर जिल्ह्यात काँग्रेस शक्तिशाली होती. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगकेर असे दिग्गज नेते काँग्रेस पक्षात होते. डॉ. पाटील यांनी भाजपमध्ये यावं, यासाठी प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे आग्रही होते. डॉ. पाटील यांच्या भाजप प्रवेशाने लातूर जिल्ह्यातील राजकारणात खळबळ उडाली. लातूर जिल्ह्यात आज भाजपने बस्तान बसवलं आहे. त्याची सुरुवात डॉ. पाटील यांच्या भाजप प्रवेशाने झाली होती, असं म्हटलं तर वावगं ठरू नये.
वैयक्तिक आयुष्यात डॉ. पाटील यांना अनेक आघात झेलावे लागले. त्यांच्या तीन अपत्यांचा दुर्धर आजाराने मृत्यू झाला, असा उल्लेख त्यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकात आहे. या धक्क्यातून तेही सावरले आणि कुटुंबियांनीही सावरले. आपले दुःख बाजूला सारून त्यांनी समाजसेवा आणि वैद्यकीय सेवेवर लक्ष केंद्रीत केले. त्यांना तीन मुली आणि एक मुलगा अशी चार अपत्ये आहेत. सर्वजण आपापल्या व्यवसायात स्थिरस्थावर झालेले आहेत.
आप्पांना एकही निवडणूक जिंकता आली नाही, म्हणून त्यांचे महत्व कमी होत नाही. लातूरच्या वैद्यकीय, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्राला त्यांच्यामुळे वलय प्राप्त झालं आहे. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करू नये, असे अनेकांना वाटत होते. अनेकांनी तशी भावना त्यांच्याजवळ बोलून दाखवली होती, मात्र आप्पा आपल्या निर्णयावर ठाम राहिले होते. ते स्वतः निवडणुकीत विजयी होऊ शकले नाहीत, मात्र लातूर जिल्ह्यात भाजपच्या यशाचा पाया त्यांनी रचला, हे नाकारता येत नाही. राजर्षि शाहू महाविद्यालयातून बाहेर पडलेले विद्यार्थी देशभरातील बहुतांश वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिकताना दिसून येतील. या शिक्षणसंस्थेला राज्यभरात नावलौकिक मिळवून देण्यात आप्पांचाही मोठा वाटा आहे.
राजकारणात प्रवेश केल्यानंतरही आप्पांनी रुग्णसेवा बद केली नव्हती. डॉक्टरांना पृथ्वीतलावरील देव म्हटलं जातं. या व्याख्येत आप्पा तंतोतंत बसतात. वयोमानानुसार अलीकडे त्यांनी वैद्यकीय सेवा बंद केली आहे. राजकारणात सक्रिय असताना वाद निर्माण होईल, असं विधान त्यांनी अपवादानंही केलं नाही. विरोधकांवर टीका करताना त्यांनी भाषेची मर्यादा पाळली, भान राखले. आप्पा हे सुसंस्कृत आहेत. त्यांनी लोकसभेची निवडणूक शिवराज पाटील चाकूरकर यांच्या विरोधात लढवली. चाकूरकर हेही सुसंस्कृतपणासाठी ओळखले जातात. निवडणुकीत अपयशी ठरले असले तरी आप्पांनी आपल्या कार्याने लातूरचा नावलैकिक वाढवला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.