नाशिक : कुसुमाग्रजनगरी मेट भुजबळ नॉलेज सिटी येथील ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास (Nashik Sahitya Sammelan) ग्रंथदिंडीने सुरवात झाली आहे. ''नाशिककरांनी संमेलनस्थळी भेट देत कार्यक्रमाचा आनंद घ्यावा,'' असे आवाहन संमेलाचे स्वागताध्यक्ष, पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले. पण हे संमेलन अध्यक्षांविनाच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॅा. जयंत नारळीकर (dr. jayant naralikar) यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. पण प्रकृतीच्या कारणास्तव ते संमेलनाला उपस्थित राहणार नसल्याचे त्यांच्या कुंटुबियांनी संमेलनाच्या आयोजकांना कळविले आहे. नारळीकरांच्या कुटुंबियांनी प्रकृती आणि सध्याचे वातावरण या पार्श्वभूमीवर संमेलनाला न जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे मराठी साहित्य संमेलन अध्यक्षांच्याविना या परंपरेत कोल्हापूर, महाबळेश्वरनंतर आता नाशिकचा क्रमांक लागला आहे.
डॉ नारळीकर यांना संमेलन उदघाटनसाठी पुण्याहून नाशिकला आणण्यासाठी चार्टर विमानाची व्यवस्था करण्यात आली होती. एक या विमानात तांत्रिक अडचण आली होती. दरम्यान आज सकाळी प्रकृतीच्या कारणास्तव डॉक्टरांची परवानगी न मिळाल्याने संमेलनाध्यक्ष येणार नाहीत असे प्रमुख कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर यांनी जाहीर केले.
यापूर्वी महाबळेश्वरच्या साहित्यसंमेलनात अध्यक्षांना भाषण करता आले नाही. कोल्हापूरच्या संमेलनासाठी अध्यक्षांना पोचता आले नव्हते, पण त्यांचे भाषण वाचून दाखविण्यात आले होते. नाशिकच्या संमेलनात नारळीकर ऑनलाईन संवाद साधणार असल्याचे समजते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) देखील प्रकृतीच्या कारणामुळं उपस्थित राहू शकणार नाहीत. ते ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत. माजी संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रेटो देखील प्रकृतीच्या कारणास्तव अनुपस्थित असणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे समारोप कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
ढगाळ हवामान, गारठा आणि धुके अशा वातावरणात आज ग्रंथदिंडीला सुरवात झाली. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या निवासस्थानापासून ग्रंथदिंडीस प्रारंभ झाला. सार्वजनिक वाचनालय पर्यंत ही ग्रंथदिंडी जाईल. त्यानंतर येथून बसमधून ती मेट भुजबळ नॉलेज सिटी मधील कुसुमाग्रजनगरीत पोहचणार आहे. त्याठिकाणी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.
''सारस्वतांच्या स्वागतासाठी कुसुमाग्रजनगरी सजली आहे. पावसाचे वातावरण असले, तरी संपूर्ण काळजी घेत संमेलनाच्या सर्व कार्यक्रमांचे नियोजन आखले आहे. हे संमेलन नाशिककरांचे असून, शहराचे नाव जागतिक पातळीवर पोचण्यासाठी नियोजनात कुठलीही उणीव भासणार नाही, याची परिपूर्ण काळजी घेण्यात येत आहे,'' असे भुजबळ यांनी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.