E20 Petrol Row: पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल ब्लेंडिंग करुन पेट्रोल पंपावर विकलं जाणारं सध्याचं पेट्रोल हे वाहनांसाठी घातकच असल्याचं आणि त्यामुळं वाहनांचे पार्ट्स खराब होत असल्याचं दिसून आलं आहे. याबाबत ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियानं (ARAI) याबाबत संशोधन केलं आहे. टाइम्स ऑफ इंडियानं या संशोधनाबाबत वृत्त दिलं आहे.
रिपोर्टमध्ये म्हटलं की, E10 कम्पॅटिबल वाहनांमध्ये E20 इंधनाच्या वापरामुळं फ्युअल सिस्टिमचे रबरापासून बनलेले पार्ट्स उदा. होज पाईप, गॅस्केट, सील आणि ओ-रिंग यांच्यामध्ये जास्त प्रमाणात घर्षण होऊन खराब झाल्याचं दिसून आलं आहे. अभ्यासामध्ये हे पार्ट्स बदलण्याची शिफारस देखील करण्यात आली आहे. सध्या हा अभ्यास सार्वजनिक करण्यात आलेला नाही. पण E20 इंधन धोरणावर आणि वाहन निर्मात्यांसाठी एक महत्वपूर्ण संदर्भ दस्ताऐवज म्हणून मानलं जात आहे.
चार चाकी वाहनांच्या इंजिनाच्या ड्युरेबिलिटी टेस्टमध्ये एक BS-IV इंजिनचा परफॉर्मन्स E20 इंधनासोबत समाधानकारक असल्याचं दिसून आलं आहे. तर BS-IV टर्बोचार्ज्ड इंजिनात २६५ तासांच्या टेस्टिंगनंतर समस्या निर्माण झाल्याचं दिसून आलं.
या अभ्यासात इंजिन ड्युराबिलिटीबाबत सांगण्यात आलं आहे की, दुचाकी आणि चार चाकी वाहनांच्या कंपन्यांकडून OEM द्वारे हे परीक्षण करण्यात आलं. यामध्ये एका कंपनीच्या इंजिनात ४०० तासांच्या परीक्षणात E20 इंधनासह काहीही समस्या दिसून आलेली नाही. याचा परफॉर्मन्स हा समाधानकारक राहिला आहे. तर दुसऱ्या कंपनीच्या इंजिनात एकूण ८०९ तासांच्या परीक्षणात एक्झॉस्ट वॉल्व्हमध्ये थर्मोमेकॅनिकल फेल्युअर नोंदवण्यात आलं आहे. थर्मोमेकॅनिकल फेल्युअर म्हणजे जेव्हा इंजिनाचं तापमान खूप प्रमाणात वाढतं, तसंच सातत्यानं यांत्रिक दबावाच्या संयुक्त प्रभावामुळं इंजिनाचं एक्झॉस्ट वॉल्व्हला घडी पडते आणि त्यामुळं त्यात फट निर्माण होते, त्यानंतर ते तुटून पडतं.
पुढे या अभ्यासात असंही दिसून आलं आहे की, परीक्षण केलेल्या सर्व वाहनांमध्ये E20 इंधनाचा धातूच्या पार्ट्सवर तसंच वाहनांच्या रचनेवर कोणताही प्रभाव पडला नाही. E20 वाहनाच्या टेलपाइप उत्सर्जन E10 अनुपालक वाहनांसाठी निश्चित कायदेशीर मानकांप्रमाणं आहेत. शिवाय, इंधनाचं बाष्पीभवन उत्सर्जन, वाहन की स्टार्टची क्षमता आणि चालवण्याचा परफॉर्मन्स देखील काही काळ समाधानकारक राहिला आहे. तथापि अभ्यासात हे निष्कर्ष काढले गेले की, E20 इंधनाच्या वाहनांसाठी इंधनाचा वापर हा E10 इंधनाच्या तुलनेत जवळपास 2 ते 6 टक्के वाढू शकतो. अहवालानुसार, ही वाढ विविध वाहनांमध्ये भिन्न असू शकते.