Mumbai News : राज्यात विधान परिषदेच्या पाच जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी प्रचार एकीकडे शिगेला पोहचला आहे. महायुती झाली आहे. मात्र, भाजपच्या वाट्याला पाच पैकी तीन जागा आल्या आहेत तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एक-एक जागेवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे पुणे शिक्षक मतदारसंघात गेल्या अनेक दिवसापासून तयारी करीत असलेल्या शिवसेनेच्या हाती काहीच आले नसल्याने नाराजी व्यक्त केली जात असतानाच महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे समोर आले आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित झालेल्या गेल्या चार दिवसातील दोन बैठकांना एकनाथ शिंदे यांनी दांडी मारली असल्याने राजकारण चांगलेच तापले आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी या बैठकांना अनुपस्थित राहण्याचे कारणच स्पष्ट केले आहे.
पुढील आठवड्यात होत असलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील अंतर्गत तणाव वाढल्याच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे. सीएम फडणवीसांच्या उपस्थित गुरुवारी झालेल्या महाडीबीटीच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) अनुपस्थितीमुळे या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे. मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली ही महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती.
यापूर्वीच्या शिंदे यांच्या गैरहजेरीमुळे ते पुन्हा एकदा नाराज झाले आहेत का, अशा प्रकारच्या अटकळी राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या. यापूर्वीही एकनाथ शिंदे त्यांच्या मूळ गावी दरेगावला गेले असता त्यांच्या नाराजीच्या बातम्या पसरवण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता या बैठकीला अनुपस्थित राहिल्याने त्यांच्या राजकीय नाराजीबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांच्या वर्षा निवसास्थानी दुष्काळ आढावा बैठक बोलवण्यात आलेली. त्यात दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांना बोलवण्यात आलेले. पण ते गैरहजर राहिले. त्याशिवाय कचरा आढावा बैठक ठेवण्यात आलेली. त्या बैठकीला सुद्धा एकनाथ शिंदे गैरहजर होते. पण त्यासाठी कारण देण्यात आलं की, त्याचवेळी नंदनवन निवासस्थानी पत्रकार परिषद होती, असे कारण सांगण्यात आले होते.
दुसरीकडे मात्र, या सर्व चर्चा निराधार आणि केवळ अफवा असल्याचे समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या पत्नीच्या ठाण्यात सुरू असलेल्या मोठ्या शस्त्रक्रियेसाठी उपस्थित होते. या महत्त्वाच्या कौटुंबिक कारणास्तव ते बैठकीला गैरहजर राहिले होते. अशाप्रकारे निराधार अफवा पसरवून राजकीय वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.