Uddhav Thackeray -Eknath Shinde Sarkarnama
महाराष्ट्र

Eknath Shinde Shivsena: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा धमाका? आष्टीकर, वाजेंनंतर 48 तासांतच ठाकरेंचा तिसरा खासदारही एकनाथ शिंदेंच्या संपर्कात

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: गेल्या काही तासांतच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या तीन खासदारांनी एकापाठोपाठ टप्याटप्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेत्यांच्या भेटी घेतल्यामुळे 'ऑपरेशन टायगर' चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News : महाराष्ट्राच्या राजकारणात वारंवार 'ऑपरेशन टायगर'ची जोरदार चर्चा होत असते. इतके दिवस ऑपरेशन टायगरच्या चर्चा या म्हणाव्या तितक्या गांभीर्यानं घेतल्या जात नव्हत्या.त्याकडे विरोधी पक्षात अस्वस्थता निर्माण करण्यासाठीचा प्रयोग म्हणून पाहिले जात होते. पण गेल्या काही तासांतच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या तीन खासदारांनी एकापाठोपाठ टप्याटप्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेत्यांच्या भेटी घेतल्यामुळे 'ऑपरेशन टायगर' चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे.

काही तासांपूर्वीच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. यापू्र्वी नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी खासदार श्रीकांत शिंदेंची भेट घेतल्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं. याचदरम्यान,आता शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनीही शिंदेंच्या जवळच्या नेत्याची भेट घेतल्यानं अहिल्यानगरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी मंगळवारी(ता.19 मे) उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या भेटीसाठी मंत्री दादा भुसेंच्या निवासस्थानी उपस्थिती लावल्यानं राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

गेल्या काही दिवसांत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांची एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेशी जवळीक वाढल्याचं पाहायला मिळत आहे. शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे तिसरे खासदार आहेत, ज्यांनी पक्षीय मतभेद विसरुन एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्याची भेट घेतली आहे. याआधी हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे हेही शिंदेंसह त्यांच्या नेत्यांच्या भेटीला गेल्याचं समोर आलं होतं.

पण आता भाऊसाहेब वाकचौरे यांनीही शिर्डीतील एमआयडीसीच्या कामानिमित्त उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेण्यासाठी गेल्याचं सांगितलं. पण समन्वय समितीची बैठक संपण्याला उशीर झाल्यानं त्यांची सामंत यांच्याशी प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही.तसेच त्यांना माघारी फिरावं लागलं.

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आजतागायत दोन्ही शिवसेनेमधून विस्तवही जात नाही.पण गेल्या काही दिवसांपासूनचा घटनाक्रम पाहता नेतेमंडळींनी विकासकामे आणि निधी यांसंदर्भात पक्षीय राजकीय वैर बाजूला ठेवत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाशी जुळवून घेण्यासाठी धडपड सुरू केली आहे.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील काही खासदार हे एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात येत आहे. शिंदेसेनेच्या वाटेवर असलेल्या ठाकरे गटातील खासदारांचा ठोस आकडा जरी समोर आलेला नसला तरी पाच ते सहा खासदार जय महाराष्ट्र करणार असल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT