Mumbai News : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सध्या सीआयडी व विशेष पोलीस पथकाकडून सुरु आहे. याप्रकरणात आठ जणांना मोक्का लावण्यात आला आहे तर एक जण फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. त्यातच बीडमधील दहशत व गुंडगिरी आणि या प्रकरणावरून धनंजय मुंडेंना जबाबदार धरले जात आहे.
दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंडेंनी राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली आहे. त्यातच यासंदर्भात एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती एका प्रश्नाला उत्तर देताना शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी मी असतो तर नैतिकता जपत राजीनामा दिला असता, असे मोठे विधान केले आहे. त्यावरुन, आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरनाईक यांचे कौतुक करणारे ट्विट केले आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन संपूर्ण राज्यातील वातावरण तापले आहे. त्यामुळेच बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. तर धनंजय मुंडे यांनी कृषिमंत्री असताना भ्रष्टाचार केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या (Dhananjay Munde) राजीनाम्याची मागणी जोर धरीत आहे.
त्यातच राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. त्यामध्ये त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भातील प्रश्नावर भूमिका जाहीर केली आहे. नैतिकता आणि लोकाग्रहास्तव या दोन वेगवेगळ्या भूमिका आहेत. नैतिकतेला धरुन राजीनामा देणे हे शंभर टक्के तेवढचं खरे आहे, माझ्यावरही असे काही आरोप झाले तर मी दुसऱ्या सेकंदाला राजीनामा देईन, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे.
दुसरीकडे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलेल्या भूमिकेचे अभिनंदन केले. आपल्या अंगावर आले की दुसर्याच्या अंगावर ढकलून द्यायचे, ही अनेकांना सवय असते. तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे खापर फोडण्याचा प्रयत्न मंत्री धनंजय मुंडे यांनी केला आहे.
उपद्याप करायचा यांनी आणि खापर दुसऱ्यावर फोडायचे; किती जणांवर असे खापर फोडून जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न करणार? असा सवालच आव्हाड यांनी धनंजय मुंडेंना विचारला आहे. पण, प्रताप सरनाईक यांनी उघड भूमिका घेतली, नैतिकतेवर राजीनामा द्यावा, असे मंत्रिमंडळातील एका सहकाऱ्याने थेट सुचवल्याबद्दल त्यांनी कौतुक केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.