Uddhav Thackeray Shiv Sena Crisis : लोकसभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे सध्या नऊ खासदार आहेत. यातील दोन तृतीयांश म्हणजे सहा खासदार वेगळे झाले, तर संसदीय नियमांनुसार स्वतंत्र गट स्थापन करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
याच फॉर्म्युल्याचा वापर करत एकनाथ शिंदे यांनी ‘ऑपरेशन टायगर’च्या पहिल्या टप्प्यात खासदारांना लक्ष्य केल्याची चर्चा आहे. शिवसेना ठाकरे पक्षातून फुटणाऱ्या सहा खासदारांपैकी एका खासदाराला केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्रीपद देण्याच्या हालचाली सुरू आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, या संपूर्ण राजकीय रणनीतीचा मोठा क्लायमॅक्स 19 जूनला पाहायला मिळू शकतो. शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या दिवशीच फुटलेल्या खासदारांचा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेत अधिकृत प्रवेश घडवून आणण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
या हालचालींचा परिणाम केवळ लोकसभेपुरता मर्यादित राहणार नाही. महाराष्ट्र विधिमंडळात शिवसेना ठाकरे पक्षाचे (ShivsenaUBT) 20 आमदार असून, त्यातील 14 आमदार वेगळे झाल्यास अपात्रतेची कारवाई टाळता येऊ शकते, अशीही राजकीय गणिते चर्चेत आली आहेत.
राजकीय विश्लेषकांच्या मते, शिंदे यांनी आधी खासदार फोडण्याची रणनीती आखली आहे. कारण शिवसेना ठाकरे शिवसेनेतील खासदारांचे संख्याबळ मिळाल्यास दिल्लीत एकनाथ शिंदे यांचे राजकीय वजन मोठ्या प्रमाणात वाढू शकते. आगामी 2029 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपलाही संख्याबळ मजबूत करण्यासाठी अतिरिक्त खासदारांची गरज भासू शकते. त्यामुळे या संपूर्ण ऑपरेशनला अप्रत्यक्षपणे भाजपकडूनही पाठबळ असल्याची चर्चा रंगली आहे.
दरम्यान, सर्वात मोठी चर्चा एका संभाव्य राजकीय बक्षिसाची सुरू आहे. सूत्रांच्या दाव्यानुसार, शिवसेना ठाकरे पक्षातून फुटणाऱ्या सहा खासदारांपैकी एका खासदाराला केंद्र सरकारमध्ये राज्यमंत्रीपद देण्याच्या हालचाली सुरू आहेत.
आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष 19 जूनकडे लागले आहे. त्याच दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचा देखील वर्धापनदिन आहे. त्या दिवशी उद्धव ठाकरेंसोबत किती खासदार आणि आमदार उभे राहतात, आणि शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ खरोखर यशस्वी होते का? यावर राज्याच्या पुढील राजकारणाची दिशा ठरणार असल्याचे मानले जात आहे.
सध्या एकच प्रश्न राजकीय वर्तुळात गाजत आहे, शिवसेना ठाकरे पक्षातून नेमके किती खासदार फुटणार? केंद्रातील मंत्रिपद कोणाला मिळणार? आणि एकनाथ शिंदेंचं ‘ऑपरेशन टायगर’ महाराष्ट्रात आणखी एक मोठा राजकीय भूकंप घडवणार का? विशेष म्हणजे, स्वतः एकनाथ शिंदे देखील सध्या दिल्ली दौऱ्यावर असून, या राजकीय हालचालींना वेग आल्याचे मानले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.