Mumbai News : सुप्रीम कोर्टात सलग दोन दिवसापासून शिवसेना पक्ष व चिन्हावर सुनावणी सुरु आहे. या सुनावणीवेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी धारेवर धरले आहे. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाची कोंडी केली असून राजकीय पक्ष हा विधामंडळ पक्षापेक्षा मोठा असतो, असे सांगत सुरुवातीला चिन्हांबाबत निर्णय घेण्याची मागणी लावून धरली आहे. त्यातच गेल्या दोन दिवसात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर आली आहे. या सुनावणीनंतर एकनाथ शिंदे यांनी रोखठोक विधान केले आहे.
सुप्रीम कोर्टात गेल्या दोन दिवसापासून शिवसेना नेमकी कोणाची? यावरून घमासान सुरु आहे. त्यातच विरोधकांच्या टीकेवर बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेना कोणाची, याचे स्पष्ट उत्तर महाराष्ट्रातील जनतेनेच आपल्या कौलातून दिले आहे. त्यासोबतच आमचा देशाच्या न्यायव्यवस्थेवर आणि संविधानावर पूर्ण विश्वास आहे, असे वक्तव्य त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले आहे.
आमच्याकडे यापूर्वी ४० आमदार होते, आता जनतेने ६० आमदारांना निवडून दिले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. त्यामुळे जनतेच्या दरबारात शिवसेनेवरचा विश्वास सिद्ध झाला असल्याचे शिंदे यांनी माध्यमाशी संवाद साधताना स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसापासून सातत्याने राज्य सरकार आणि मुख्यमंत्री ‘घटनाबाह्य’ असल्याचा आरोप करणे ही विरोधकांची आता जुनी ‘रिपीट कॅसेट’ झाली आहे. जेव्हा एखादा निर्णय यांच्या बाजूने लागतो, तेव्हा हे न्यायालयाचे कौतुक करतात आणि निर्णय विरोधात गेला की न्यायव्यवस्था व निवडणूक आयोगावर आरोप करतात, असा टोला यावेळी शिंदे यांनी विरोधकांना लगावला.
दरम्यान, लोकशाहीत बहुमताला मोठे महत्त्व आहे. हे प्रकरण सध्या न्यायालयात असल्याने त्यावर अधिक भाष्य करणे योग्य ठरणार नाही, परंतु आमचा देशाच्या न्यायव्यवस्थेवर आणि संविधानावर पूर्ण विश्वास आहे, असेही यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचे यावर सुप्रीम कोर्टात पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.