Eknath Shinde, Uddhav Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

Shinde Vs Thackeray : शिंदे ठाकरेंना आणखी एक धक्का देणार अन् तोही मुंबईतच ! एक आमदार गळाला ?

Sachin Waghmare

Mumbai News : शिवसेनेत फूट पडून २० महिन्यांचा कालावधी लोटला आहे. त्यानंतरही उद्धव ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेतील आमदारांचा मोठा गट उद्धव ठाकरे यांची साथ सोडून गेला होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या ५६ आमदारांपैकी ४० आमदार व १२ खासदार सोडून गेले आहेत. आता केवळ १६ आमदारच उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. त्यातच आता ठाकरे गटाचा आणखी एक आमदार फुटणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

गेल्या अनेक दिवसापासून ठाकरे गटाचा एक आमदार एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यांच्या काही गुप्त बैठका झाल्या असून येत्या १५ दिवसांत प्रवेश होणार असल्याचे समजते. एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाच्या या आमदाराची काही दिवसांपूर्वीच गुप्त बैठक पार पडल्याचे समजते. यावेळी संबंधित आमदाराने एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केल्याचे समजते. त्यामुळे आगामी काळात ठाकरे गटाला आणखी एक खिंडार पडण्याची शक्यता आहे.

आगामी लोकसभा निवडणूका डोळ्यसमोर ठेवून उद्धव ठाकरे संपूर्ण राज्याचा दौरा करीत आहेत तर आदित्य ठाकरे मुंबई पिंजून काढत असताना त्यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या आमदारासोबत ठाकरे गटाचे स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारीही शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

शिंदे गटाच्या वाटेवर असणारा हा आमदार नेमका कोण?, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. सध्या राजकीय वर्तुळात याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दुसरीकडे ईडीच्या चौकशीला घाबरून एक आमदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे. आमदार रवींद्र वायकर यांना ईडी चौकशीच्या धमक्या येत असून त्यांना पक्ष प्रवेशाची ऑफर दिली जात असल्याचे ट्विट खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी केले आहे. त्यामुळे या चर्चेला उधाण आले आहे.

या बाबत बोलताना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले की, ठाकरे गटातील सर्कशीला आमदार कंटाळले आहेत. त्यामुळे अनेक आमदार शिंदे गटात येण्यासाठी इच्छूक आहेत. त्यासाठी कुणावर दबाव आणला जात नाही. धमक्यांना भिणारे कोण नसतात, कसल्याही दबावाला शिवसैनिक घाबरत नाहीत. लोकसभा निवडणुकीपूर्वीच अनेक आमदार आमच्याकडे येतील, असेही त्यांनी सांगितले.

R

SCROLL FOR NEXT