Maharashtra Election News: महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागांसाठी निवडणुकीचं रणशिंग फुंकण्यात आलं आहे. दिल्लीत पत्रकार परिषद घेत आयोगानं निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. तसेच, 20 नोव्हेंबरला निवडणूक होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. आयोगानं निवडणुकीचं ‘बिगुल’ वाजवल्यानं राज्यात आचारसंहिता लागली आहे.
29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. 30 ऑक्टोबरला उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे. 4 नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेता येईल, अशी माहिती निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात बरीच उलथापालथ झाली. शिवसेनेनं भाजपची साथ सोडत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत एकत्र येत महाविकास आघाडीच्या ( Mahavikas Aghadi ) माध्यमातून सरकार स्थापन केलं. मात्र, अडीच वर्षानंतर एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह शिवसेनेत बंडखोरी केल्यानं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं.
नंतर भाजप आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र येत महायुतीचं सरकार स्थापन केलं. ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह आणि ‘शिवसेना’ हे नाव एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळालं. तसेच, अजितदादा यांनीही जुलै 2023 मध्ये महायुती सरकारला काही आमदारांसह ‘सपोर्ट’ दिला. अजितदादा यांच्या पक्षालाही ‘राष्ट्रवादी’ हे नाव आणि ‘घड्याळ’ चिन्ह निवडणूक आयोगानं दिलं.
त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतील एकूण सहा पक्ष एकमेकांसमोर मैदानात उतरणार आहेत. ‘राष्ट्रवादी’ आणि ‘शिवसेने’त फूट पडल्यानंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत अर्थात लोकसभेला महाविकास आघाडीला 31 जागा मिळाल्या आहेत. तर, महायुतीला फक्त 17 जागांवर समाधानी राहावं लागलं.
लोकसभेला ‘440 व्होल्ट’चा झटका बसल्यानंतर महायुतीनं ताकही फुकूंन पिले. यासाठी ‘लाडकी बहीण’, ‘लाडका भाऊ’ यासह अनेक योजनांच्या घोषणांचा पाऊस पाडला. आता मात्र आयोगानं निवडणुकीचं रणशिंग ‘फुंकलं’ आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रणांगणात महायुती की महाविकास, कोण बाजी मारतं हे आगामी काळात स्पष्ट होईल.
भाजपचे – 105 आमदार
तत्कालीन शिवसेना – 56
तत्कालीन राष्ट्रवादी – 54
काँग्रेस – 44
अपक्ष – 13
इतर – 16
भाजप – 105
शिवसेना ( शिंदे गट ) – 40
राष्ट्रवादी ( अजितदादा पवार ) – 42
काँग्रेस – 44
शिवसेना ( ठाकरे गट ) – 16
राष्ट्रवादी ( शरदचंद्र पवार ) – 12
मतदारसंघ : 288
पुरूष मतदार : 4.95 कोटी
महिला मतदार : 4.64 कोटी
तृतीयपंथी मतदार : 5,997
दिव्यांग मतदार : 6 लाख 32 हजार
शहरी भागातील मतदान केंद्राची संख्या : 42 हजार 585
ग्रामीण भागातील मतदान केंद्राची संख्या : 57 हजार 601
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.